Tue, Jan 22, 2019 07:39होमपेज › Goa › कदंबच्या कर्नाटकात जाणार्‍या ३६ बसेस बंद  

कदंबच्या कर्नाटकात जाणार्‍या ३६ बसेस बंद  

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 26 2018 1:21AMपणजी : प्रतिनिधी

म्हादई पाणी प्रश्‍नावरून कर्नाटक राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदमुळे गोव्याच्या कदंब महामंडळाच्या 36  बसेस गुरूवारी कर्नाटकात गेल्या नाहीत. यामुळे गोव्याहून बेळगाव, हुबळी, धारवाड आदी भागांमध्ये जाणार्‍या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाल्याचे ‘कदंब’चे अध्यक्ष तथा आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सांगितले. दरम्यान, गोव्याच्या काही खासगी वाहनांवर कर्नाटकात दगडफेक झाली असल्याचे वृत्त आहे.

कर्नाटक बंदच्या पार्श्‍वभूमीवर कदंब परिवहन महामंडळाने बुधवारी रात्रीपासूनच कर्नाटकातील आपली प्रवासी बससेवा थांबवली असून फक्त  बेंगळुरू व म्हैसूरला  दोन बसेस सोडण्यात आल्या, त्या गुरूवारी पहाटे तिथे दाखल झाल्या. कदंबच्या अन्य बसेस कर्नाटकात गेल्या नसल्याचे कार्लूस यांनी सांगितले. 

गोव्याहून  कर्नाटकात  गेलेल्या काही खासगी वाहनांवर दगडफेक करण्यात आली. अनेक गोमंतकीयांनी गुरुवारी कर्नाटकमध्ये आपल्या खासगी वाहनातून जाणे  टाळले. त्यामुळे कदंब बस स्थानकांवर व अन्यत्र ठिकाणी शेकडो प्रवासी  अडकून पडले असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

धान्यपुरवठ्यावर परिणाम

कर्नाटकातून भाजी, कोंबड्या, मांस, अंडी, कडधान्ये घेऊन येणारी मोजकी वाहने गुरुवारी गोव्यात दाखल झाली. फलोत्पादन महामंडळासाठी भाजी घेऊन जे ट्रक येतात, ते मात्र गोव्यात दाखल झाले आहेत. कर्नाटक बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी दगडफेक होत असल्याने माल व प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला.