Sun, Apr 21, 2019 01:55होमपेज › Goa › मराठी सिनेसृष्टीशी गोव्याचे नाते दृढ करणारा महोत्सव : श्रीपाद नाईक  

मराठी सिनेसृष्टीशी गोव्याचे नाते दृढ करणारा महोत्सव : श्रीपाद नाईक  

Published On: Jun 11 2018 1:05AM | Last Updated: Jun 11 2018 1:05AMपणजी : प्रतिनिधी 

मराठी चित्रपट आणि गोमंतकीयांचे अनोखे नाते असून हे नाते 11व्या मराठी चित्रपट महोत्सवामुळे आणखी दृढ झाले आहे. गोव्यात दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या या महोत्सवामुळे मराठी चित्रपटसृष्टीशी गोमंतकीय रसिकांचे नाते आणखी बळकट होतेय. हे प्रेम कायम राहो, अशी सदिच्छा आयुषमंत्री तथा खासदार श्रीपाद नाईक  यांनी व्यक्त केली. 

कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात 11 व्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या समारोपावेळी नाईक  बोलत होते. समारोप  सोहळ्यात व्यासपीठावर चित्रपटाच्या दिग्दर्शिका  स्वप्ना वाघमारे जोशी, अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री तृप्ती तोरडमल, राकेश बापट, गायक स्वप्नील बांदोडकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी मंत्री नाईक यांच्या हस्ते चित्रपटाचे दिग्दर्शक   व कलाकारांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये ‘कच्चा लिंबू’चे दिग्दर्शक प्रसाद ओक, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी, ‘धप्पा’चे दिग्दर्शक संकेत शहा, लघुपट ‘मय्यत’चे निर्माते सुयश शिंदे आणि ‘पावसाळ्याचा निबंध’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे आदी मान्यवरांचा  सत्कार करण्यात आला. 

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी  म्हणाल्या की, गोव्यातील चित्रपट रसिक सुजाण आणि चोखंदळ असल्याचे नेहमी जाणवते. मुसळधार पावसातसुद्धा मोठ्या संख्येने हजेरी लावणार्‍या गोमंतकीय रसिकांची अनुभूती पुन्हा पाहण्यास मिळाली, याबद्दल आपण आभारी आहोत. 

सुबोध भावे म्हणाले की, कोणताही चित्रपट नुसता पूर्ण करून काम संपत नाही, तो मायबाप प्रेक्षकांच्या भेटीस आला पाहिजे. हे मौल्यवान काम ‘विन्सन’ करत असून गोमंतकीय हुशार, समंजस आणि मराठी चित्रपटांवर मनापासून प्रेम करणारा आहे. यामुळेच दरवर्षी नवीन काहीतरी रसिकांच्या भेटीस आणण्याची स्फूर्ती आम्हा कलाकारांना मिळतेे. 

मराठी चित्रपट महोत्सवात रविवारी कला अकादमीत ‘कच्चा लिंबू’, ‘फर्जंद’, ‘व्हीडीओ पार्लर’ तर आयनॉक्समध्ये ‘बकेट लिस्ट’,  ‘निद्राय’, ‘न्यूड’, ‘बबन’, ‘आम्ही दोघी’ हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. मॅकनिझ पॅलेसच्या दोन थिएटरमध्ये  ‘पिंपळ’, ‘गुलाबजाम’, ‘इडूक’ व ‘ रणांगण’, ‘रेडू ’,‘व्हॉट्सअप लग्न’ आदी चित्रपट दाखविण्यात आले. रविवारची सुट्टी असल्याने सर्व चित्रपटांना चांगला प्रेक्षकवर्ग लाभला. महोत्सवाच्या समारोपाला जॉन अब्राहम निर्मित ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरला प्रेक्षकांनी अफाट गर्दी  होती.वास्को येथे रविवारी ‘गुलाबजाम’, ‘न्यूड’ व ‘पिंपळ’ या चित्रपटांनाही लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.