Thu, Nov 15, 2018 07:38



होमपेज › Goa › मिरामार किनारी साधनसुविधांसाठी निविदा जारी

मिरामार किनारी साधनसुविधांसाठी निविदा जारी

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 23 2018 12:00AM



पणजी : प्रतिनिधी

राज्यातील सर्वात सुंदर व सुरक्षित किनारा हे ‘ब्ल्यू फ्लॅग’  मानांकन प्राप्त झालेल्या मिरामार किनार्‍यावर सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या साधनसुविधा निर्माण करण्यासाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या ‘सोसायटी ऑफ इंटेग्रेटेड कोस्टल मॅनेजमेंट’ या संस्थेने निविदा मागविल्या असून मिरामार किनार्‍यावर प्रसाधनगृहे, विद्युत प्रकाश योजना, पार्किंग सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून टेहेळणी यंत्रणा आदी व्यवस्था केली जाणार आहे. ही संस्था ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी’च्या समन्वयाने  काम करणार असल्याची  ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी’  चे संचालक तथा पणजीचे माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी माहिती दिली. 

केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या पुढाकारातून किनारी भागातील राज्यांना असे मानांकन देण्यासाठी किनारे सुचविण्यासाठी सांगण्यात आले होते.  उत्तर व दक्षिण गोव्यातील एका किनार्‍याची शिफारस करण्याचे राज्य सरकारने याआधी ठरविले होते. मात्र, नंतर मिरामार या एकाच किनार्‍यावर सरकारने शिक्कामोर्तब केले. 

मिरामार किनारा राजधानीपासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटरवर असून येथे भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. याविषयी कुंकळ्येकर म्हणाले, की ‘ब्ल्यू फ्लॅग’ निकषात मिरामार किनार्‍याची निवड होणे ही तशी भूषणावह बाब आहे. या किनार्‍याचा पर्यावरणाभिमुख विकास केला जाणार आहे. पर्यटन व्यवसायाशी संबंधित घटक, स्थानिक मच्छिमार, स्थानिक रहिवाशी यांची समिती स्थापन केली जाईल. यासाठी सध्या साधन सुविधा व सोयी स्थापन करण्यासाठी  निविदा जारी करण्यात आल्याने आता एक दोन महिन्यात ‘वर्क ऑर्डर’ काढून पावसाळ्यानंतर काम सुरु होईल.’

कुंंकळ्येकर म्हणाले, की पणजीतील  हाती घ्यावयाच्या प्रकल्पांबाबत लोकांबरोबर  सल्ला मसलत केला जात आहे. शहरात विशेष गरजा असलेल्या व्यक्तींनाही सुलभपणे वापरता येतील, असे खास पदपथ निर्माण करण्याची योजना आहे.  शहरवासियांना पुरेसे पिण्याचे पाणी, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची  सुरक्षा, कचरा समस्या निर्मूलन या गोष्टींवर भर देऊन शहराचा सर्वांगिण विकास साधला जाणार आहे. मळा संवर्धन प्रकल्पासाठी अंतर्गत रस्ते केले. मळा भागात घरे एकमेकांना खेटून आहेत. तेथे वीज वाहिन्या व इतर गोष्टी भूमिगत करण्यात आल्या. अमृत योजने अंतर्गत पदपथ बांधले. आल्तिनोला जाण्यासाठी पायर्‍या बांधल्या. कांपाल येथे नदी तटाचे सौंदर्यीकरण केले. नवे पदपूलही बांधण्यात आले आहेत. रायबंदरची वीज समस्या त्या भागात स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत भूमिगत विद्युत वाहिन्या टाकून दूर केली जाईल. रायबंदरसाठी अन्य काही प्रकल्पही विचाराधीन आहेत, अशी माहिती कुंकळ्येंकर यांनी दिली. रुअ द औरे खाडीवरील खारफुटींचे दर्शन घडविण्यासाठी लाकडी पूल बांधला. स्मार्ट सिटी म्हणजे केवळ काँक्रिटच्या इमारतीत स्थलांतर करणे नसून पुरातन वारसा वास्तू जपणे हाही हेतू आहे, असे त्यांनी सांगितले.