Thu, Jul 18, 2019 13:03होमपेज › Goa › तंत्रज्ञानामुळे नोकर्‍यांची नवी दालनेही खुली होतील! 

तंत्रज्ञानामुळे नोकर्‍यांची नवी दालनेही खुली होतील! 

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 30 2017 12:23AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि विविध क्षेत्रामध्ये संशोधन होत असल्याने भविष्यात आणखी नोकर्‍या संपुष्टात येऊ शकतील. यासोबत विविध क्षेत्रातील नोकर्‍यांची नवी दालनेही उपलब्ध होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी टेकफेस्टच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना केले. तसेच हे आव्हान स्वीकारण्यासाठी आपली व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. टेकफेस्टमध्ये दुसर्‍या दिवशीही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी याठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये विविध रोबोटीक्सचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. 

तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रात संशोधन होत असल्याने संशोधन क्षेत्रामध्ये तरूणांना नेतृत्त्व करण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा फायदा घेऊन आपल्या देशातील तरुणांनी तंत्रज्ञान क्षेत्रात अधिकाधिक संशोधन करणे ही काळाची गरज असल्याचे पर्रीकर म्हणाले. तसेच रोबोटीक्समुळे विविध क्षेत्रांमध्ये नवनवीन संशोधन होत असून सध्याच्या अनेक नोकर्‍या संपुष्टात आल्या आहेत. भविष्यात आणखी नोकर्‍या संपुष्टात येऊ शकतील, मात्र याचबरोबर नोकर्‍यांची नवी दालनेही खुली होतील. हे आव्हान स्वीकारण्यासाठी आपली व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे, असेही पर्रीकर यावेळी म्हणाले. आयआयटीतील टेकफेस्टमध्ये प्रदर्शनासाठी आलेली विविध संशोधने फक्त संशोधन पातळीवर न राहता त्याला व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच पुढच्या टेकफेस्टच्यावेळी या वर्षीचे किमान दोन संशोधनांचे व्यावसायिकीकरण झाले असेल, अशी खात्रीही त्यांनी दिली. 

देशाचा संरक्षण विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम झाला असला तरी तो अधिक सक्षम होणे आवश्यक असल्याचे पर्रीकर यावेळी म्हणाले. विद्यमान सरकारने संरक्षण क्षेत्राला आणखी बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नामुळेच तेजस या भारतीय बनावटीच्या विमानाचे उड्डाण यशस्वी झाले. तसेच राफेल विमानांच्या खरेदीमुळे भारतीय संरक्षण दल अधिक सक्षम झाले आहे. भविष्यात आपण पूर्णतः भारतीय बनावटीवर अवलंबून राहण्यासाठी संरक्षण खाते विशेष प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. याचाच एक भाग म्हणून भारताची जीपीएस प्रणालीही सक्षम करण्यात आली. आज भारतीय बनावटीच्या जीपीएस प्रणालीमध्ये भारतातील प्रत्येक गावाचा समावेश करण्यात आला असल्याचेही पर्रीकर यावेळी म्हणाले. 

प्रदर्शनामध्ये विविध देशांचा सहभाग 

आयआयटी मुंबईमधील टेकफेस्टमध्ये आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये विविध देशांनी सहभाग घेत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवलेला रोबोट आणि विविध तंत्रज्ञान सादर केले. या प्रदर्शनाला विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यामध्ये स्वयंचलित रोबोट, पाण्यातील रोबोट, 20 विविध भाषांमध्ये संभाषण करणारा रोबोट आणि विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान यावेळी प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले होते. तसेच यावेळी या तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांसोबत संवाद साधत आणखी माहिती घेतली. तसेच यावेळी दोन रोबोटमध्ये वॉर स्पर्धा झाली. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटिक्स कारच्या स्पर्धाही झाल्या.