Wed, Jul 17, 2019 18:02होमपेज › Goa › शिक्षणपद्धतीचा विचार उद्दिष्टापासून व्हावा

शिक्षणपद्धतीचा विचार उद्दिष्टापासून व्हावा

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 14 2018 11:56PMपणजी : प्रतिनिधी

भारतातील शिक्षणपध्दतीचा विचार हा  शिक्षणाचे नेमके उद्दिष्ट काय आहे  येथून व्हायला हवा. शिक्षणाचा मुख्य हेतू हा शेवटी नोकरी मिळवणे किंवा एखाद्या गोष्टीत नफ ा कमवणे या पुरताच सिमित राहणार असेल तर ही फार चिंताजनक बाब आहे. एखाद्या विषयात शिक्षण घेतल्यानंतर नोकरी  मिळत नसेल तर पुढाकार घेऊन संधी निर्माण कशी करावी याचा विचार करायला हवा, असे मत जया रामचंदानी यांनी व्यक्‍त केले. 

कला अकादमीत सुरू असलेल्या 11 व्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात  ‘द स्टोरी ऑफ फाऊंडेशन’ च्या संचालक  जया रामचंदानी  ‘21व्या शतकात शिक्षणातला विरोधाभास’  या विषयावर बोलत होत्या.

रामचंदानी म्हणाल्या, आपण अभ्यासाच्या दृष्टीने  मुलांकडून त्यांच्यासाठी शक्य नसतील अशा अनेक   गोष्टींची अपेक्षा ठेवतो.  मुलांनी शाळेतील  वर्ग किंवा घराच्या चार भिंतीत राहून आपली  सर्जनशीलता दाखवावी, अशा अपेक्षा मुलांकडून ठेवल्या जातात, ज्या पूर्ण करणे त्यांना शक्य नाही, हे कुणीही सांगू शकेल. या गोष्टी आता समजून घेउन त्यावर मार्ग शोधण्याची वेळ आली आहे.  

देशातील ज्ञान किंवा ठरलेल्या अभ्यासक्रमातील शिक्षण संपादन करण्याबाबत आपण खूष आहोत की नाही, हा प्रश्‍न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. आपण काय शिकत आहोत, ते कसे शिकत आहोत व का शिकत आहोत हे माहित असणे महत्त्वाचे आहे. आपण शिकतोय तो विषय कुणी आपल्यावर लादलेला तर नाही ना, या प्रश्‍नावरून आपल्या शिक्षणाची सुरूवात होते, असे रामचंदानी यांनी सांगितले.  

देशातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आजही परवानगीची गरज लागते. शिक्षण हे माणसाला बाहेरून आत्मसात करावे लागते तर शिकणे ही कला आपल्यातच  दडलेली असते.  त्यामुळे शिक्षण कसे शिकावे हा निर्णय विचार करूनच घेतला पाहिजे, कारण हीच गोष्ट माणसाचे भविष्यातील  यश किंवा अपयश ठरवते, असे त्या म्हणाल्या.

शिक्षण प्रक्रियेत बदल व्हावा असे अनेकांना  वाटते . ही प्रक्रिया सर्वांनी मिळुन तयार करायला हवी. नियमित अभ्यासक्रमातून बाहेर पडुन त्याचा विचार प्रत्येक विद्यालयाकडून केला जायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्‍त केले. जया रामचंदानी यांनी ‘द स्टोरी ऑफ फाऊंडेशन’ या संस्थेचे काही व्हिडीओ यावेळी दाखविले. ज्यात अभ्यासक्रमासोबत मिळून एखादी गोष्ट शिकण्याचे कितीतरी विविध मार्ग सांगण्यात आले होते.