Sun, May 26, 2019 18:39होमपेज › Goa › संप मागे घेतल्यानेच तोडगा 

संप मागे घेतल्यानेच तोडगा 

Published On: Jan 22 2018 1:25AM | Last Updated: Jan 21 2018 11:18PM
पणजी : प्रतिनिधी

टॅक्सीवाल्यांनी बेकायदेशीररीत्या सुरू केलेला संप मागे घेतल्यानंतरच आपण तोडगा काढण्याबाबत सहमती दर्शवली आहे. केंद्रीय मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार, जर राज्यातील टॅक्सींना पुरेशा प्रमाणात ‘स्पीड गव्हर्नर’ मिळत नसतील तर ते बसवण्याची मुदत वाढवण्याला सरकारने मान्यता दर्शवली आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात, गोव्यातील टॅक्सींना ‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याची अट शिथिल करावी, अशी हस्तक्षेप याचिका सरकारतर्फे दाखल करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. 

खासगी टॅक्सीवाल्यांनी गेले दोन दिवस सुरू असलेला संप मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर  संध्याकाळी पर्रीकर यांनी आपल्या शासकीय बंगल्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पर्रीकर म्हणाले की, उपसभापती मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली टॅक्सीवाल्यांचे शिष्टमंडळ आपल्याला भेटायला आले असता, टॅक्सीमालकांनी सरकारला विश्‍वासात न घेता अथवा संपाबाबत सूचना न देता संप पुकारल्याचे स्पष्ट दाखवून दिले. अशी सूचना आली असती तर त्यावर याआधीच चर्चा करून मार्ग काढला गेला असता असे सांगण्यात आले. जर राज्यात  ‘स्पीड गव्हर्नर’ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसेल तर टॅक्सी संघटनेने ही बाब सरकारच्या नजरेत आणून द्यायला हवी होती. अशा प्रकारचे पत्र जर सोमवारपर्यंत प्राप्त झाले तर केंद्राकडे ‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याबाबत आणखी मुदत वाढवून देण्याची मागणी केली जाऊ शकते. केंद्रीय मोटर वाहन कायद्याच्या कलम 110 -(3-ब) नुसार, राज्यात ‘स्पीड गव्हर्नर’ कमी प्रमाणात मिळत असेल तर ते बसवण्यासाठी असलेली मुदत वाढवण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. तशा मागणीचे पत्र केंद्राला पाठवण्यात येईल. 

राज्यातील काही भागातील रूंद रस्ते  व महामार्ग पाहता ‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याची गरज नसल्याचे आपले वैयक्तीक मत आहे. या यंत्रामुळे वाहनाचा वेग प्रतितास 80 कि.मी. च्या वर जाऊ शकत नाही. यामुळे गाडीला दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करण्यास अडचण होऊन अपघात होण्याची भीती असते. या कारणासाठी गोव्यात टॅक्सींना ‘स्पीड गव्हर्नर’ बसवणे बंधनकारक नको, अशी हस्तक्षेप याचिका सर्वोच्च न्यायालयात राज्यातर्फे दाखल केली जाणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.