Tue, Mar 26, 2019 11:47होमपेज › Goa › टॅक्सीवाल्यांचा संप मोडणार

टॅक्सीवाल्यांचा संप मोडणार

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 1:25AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

टॅक्सीवाल्यांनी  19 जानेवारीपासून संप पुकारला असला तरी त्याबाबत सरकारला कोणतीही कल्पना दिली नसल्याने हा संप बेकायदेशीर ठरतो.  या संपात कोणीही,  मग भले आमदारही सामील झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. संपाच्या काळात सावधगिरी आणि पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी गाड्यांची तसेच सुमारे 350 अतिरिक्त बसेसची सेवा सरकारने तयार ठेवली आहे. गाड्या रास्ता रोको करण्यासाठी वापरल्यास ते उचलून नेण्यासाठी 80 क्रेन्स उपलब्ध असून  पोलिस फौजफाटाही सज्ज ठेवला आहे, अशी माहिती वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. 

मंत्री ढवळीकर म्हणाले, की टॅक्सीवाल्यांनी काही मागण्या  सरकारकडे केल्या असून त्यातील अधिकतर मागण्या मान्य केल्या आहेत. याशिवाय अन्य कोणत्याही राज्यात मिळणार नाही, अशा सवलती आणि अनुदान सरकारने टॅक्सी मालकांना दिले आहे.  डिजिटल मीटर  आणि ‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. यातील टॅक्सींना ‘स्पीड गव्हर्नर’  बसवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वीच दिला असून  आतापर्यंत सरकारने सक्ती केली नव्हती. मात्र, नव्या वाहतूक कायद्यानुसार, त्याबाबतीत सरकार माघार घेऊ शकत नाही. गोवा हे पर्यटनावर अवलंबून असणारे राज्य आहे, याचे भान ठेवून  टॅक्सी मालकांनी  आपला संप मागे घेऊन सरकारशी चर्चेसाठी यावे, असे ते म्हणाले. 

 ...तर टॅक्सींचे परवाने  रद्द करू : मुख्यमंत्री

संपाच्या वेळी कायदा हातात घेतल्यास सरकार अजिबात खपवून घेणार नाही. पोलिसांना कडक कारवाईचा आदेश दिला आहे. रस्त्यावर धुडगूस घालणार्‍या व संपात सहभागी होणार्‍या टॅक्सीवाल्यांवर गुन्हेगारी खटले दाखल करून  त्यांचे परवाने रद्द केले जातील. त्यांना दिलेले सरकारी अनुदान व अन्य सवलतीही काढून घेण्यात येतील,असा इशारा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकारांशी  बोलताना दिला.