Tue, Apr 23, 2019 23:57होमपेज › Goa › टॅक्सीवाल्यांचा संप स्थगित

टॅक्सीवाल्यांचा संप स्थगित

Published On: Jan 22 2018 1:25AM | Last Updated: Jan 21 2018 11:26PMपणजी : प्रतिनिधी

गोव्यातील सुमारे दोन हजार खासगी टॅक्सींना ‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याची अट शिथिल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची तसेच टॅक्सींना फिटनेस प्रमाणपत्रे देण्याची मागणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मान्य केली. त्यामुळे गेले दोन दिवस सुरू असलेला टॅक्सीवाल्यांचा संप अखेर तिसर्‍या दिवशी, रविवारी (दि.21) तात्पुरता स्थगित करण्यात आला.

दरम्यान, प्रलंबित फिटनेस प्रमाणपत्रे मंगळवार (दि.23) पासून देण्यात येतील, असे लेखी आश्‍वासन  उपसभापती मायकल लोबो यांनी दिले. 

लोबो यांच्या नेतृत्वाखाली टॅक्सीमालकांच्या 21 जणांच्या शिष्टमंडळाने दुपारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची त्यांच्या शासकीय बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर लोबो यांनी पत्रकारांना सांगितले, की सर्वोच्च न्यायालयात राज्यातर्फे टॅक्सींना ‘तंदुरुस्ती प्रमाणपत्रे’ देण्याची अट शिथिल करण्याविषयी  हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. या आश्‍वासनानंतर टॅक्सीवाल्यांनी संप मागे घेण्याचे मान्य केले आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपसभापती मायकल लोबो यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर येथील आझाद मैदानावर जमलेल्या टॅक्सीवाल्यांसमोर आंदोलकांचे नेते तथा टॅक्सीमालक संघटनेचे पदाधिकारी बाप्पा कोरगावकर यांनी  संध्याकाळी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची  घोषणा केली.