Mon, Apr 22, 2019 04:01होमपेज › Goa › प्रतिमा कुतिन्होंविरुद्ध  तारा केरकर यांची तक्रार

प्रतिमा कुतिन्होंविरुद्ध  तारा केरकर यांची तक्रार

Published On: Jul 10 2018 12:31AM | Last Updated: Jul 10 2018 1:01AMपणजी : प्रतिनिधी

प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगे येथे  विनयभंग झालेल्या अल्पवयीन मुलीची ओळख सार्वजनिक केल्याची तक्रार सवेरा ट्रस्टच्या तारा केरकर यांनी पणजी येथील महिला पोलिस स्थानकात सोमवारी दाखल केली.

कुतिन्हो यांनी यापूर्वीदेखील एका पीडित युवतीची ओळख जाहीर केली होती. त्यामुळे कुतिन्हो यांच्याविरोधात एफआयआर नोंदवावा, अशी मागणी केरकर यांनी तक्रारीत केली आहे.

सांगे येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी सांगे पोलिस स्थानकात गुन्हा नोंद आहे. पीडित  युवती व तिच्या कुटुंबीयांची प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा कुतिन्हो व  सहकार्‍यांनी मागील आठवड्यात   भेट घेतली. या भेटीची माहिती तसेच पीडितेच्या कुटुंबीयांचे फोटो कुतिन्हो यांनी सोशल मीडियावर प्रसृत केले. यामुळे पीडितेची ओळख सार्वजनिक झाल्याचे केरकर यांनी  तक्रारीत नमूद केले आहे.

कुतिन्हो यांनी यापूर्वीदेखील अन्य एक पीडित युवती व तिच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर प्रसृत केले  होते. कुतिन्हो या पेशाने  वकील असल्याने पीडितेची माहिती सार्वजनिक करू नये, या कायद्यातील तरतुदीचे ज्ञान त्यांना असायला हवे, असेही त्या म्हणाल्या. 

भाजप महिला मोर्चाही तक्रार करणार ः सावंत

प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष  प्रतिमा कुतिन्हो यांच्या विरोधात  भाजप महिला मोर्चातर्फेदेखील पणजी येथील महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली जाणार असल्याचे मोर्चाच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत यांनी सांगितले. पीडित युवतीची ओळख सार्वजनिक करणे हा कुतिन्हो यांचा पब्लिसिटी स्टंट आहे. अशा प्रकारे पीडित युवतीची ओळख  सार्वजनिक करणे गुन्हा ठरत असल्याचेही त्यांनी  सांगितले.