Thu, Jun 27, 2019 10:23होमपेज › Goa › खाणी सुरू करण्यास पावले उचला

खाणी सुरू करण्यास पावले उचला

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 17 2018 11:24PMपणजी : प्रतिनिधी

गोव्यातील खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी करणारे निवेदन गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी  दिल्‍लीत केंद्रीय खाण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना सादर केले.गोव्यातील खाणी पुन्हा सुरू व्हाव्यात अशी केंद्राचीदेखील इच्छा आहे. यासाठी राज्य सरकारने  केंद्राला खाणीविषयी सविस्तर प्रस्ताव पाठवावा. त्याची दखल घेतली जाईल, असे आश्‍वासन मंत्री तोमर यांनी दिल्याचे फ्रंटचे नेते पुती गावकर यांनी सांगितले. दरम्यान, खाणींसंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्याचाही बुधवारी (दि.18) प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गावकर म्हणाले की, राज्यातील खाण व्यवसाय सुरू व्हावा, यासाठी फ्रंटकडून लढा दिला जात आहे. खाण व्यवसायावर 3 लाखांहून अधिक लोक प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. खाणी सुरू करण्यासाठी  वटहुकुम जारी करणे हा  उपाय आहे.   त्यामुळे वटहुकुमासंदर्भात गोवा विधानसभेच्या  पावसाळी अधिवेशनात  सरकारने  एकमताने ठराव मंजूर करावा, अशी मागणी केली जात आहे. या ठरावाला सर्व आमदारांनी पाठिंबा द्यावा, यासाठी त्यांना फ्रंटकडून निवेदने दिली जात आहेत.  सरकारने हा ठराव मंजूर न केल्यास विधानसभेवर धडक मोर्चा नेण्याची फ्रंटची तयारी असल्याचेही गावकर यांनी सांगितले.