Tue, May 21, 2019 22:42होमपेज › Goa › वाहतूक नियमांचे उल्‍लंघन करणार्‍यांवर कारवाई करा

वाहतूक नियमांचे उल्‍लंघन करणार्‍यांवर कारवाई करा

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 05 2018 11:51PMपणजी : प्रतिनिधी

वाहतूक नियमांचे उल्‍लंघन करणार्‍या वाहनचालकांच्या  कुठल्याही दबावाला बळी न पडता कारवाई करावी, असे मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर यांनी वाहतूक खात्यातर्फे आयोजित केलेल्या 8 व्या  राज्य रस्तासुरक्षा सप्‍ताहाच्या उद्घाटन प्रसंगी  पणजीत सांगितले. राज्यात मागील एका वर्षात वाहतूक नियमांचे उल्‍लंघन करणार्‍या सुमारे 6 लाख जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असेही पर्रीकर यांनी सांगितले.

पर्रीकर म्हणाले, की  वाहतूक शिस्त ही महत्त्वाची असून त्याचे उल्‍लंघन  करणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे. वाहतूक खाते, वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमांचे उल्‍लंघन होत असल्याचे दिसून आल्यास त्यांनी  कुठल्याही दबावाला बळी न पडता  कारवाई करावी.  अपघात पीडीत  केवळ राज्यासाठीच नव्हे तर  त्याच्या कुटुंबीयांसाठी देखील   नुकसानच आहे. वाहतूक नियमांचे   कोणी उल्‍लंघन करीत  असल्यास त्यांना थांबवून  तसे न करण्याची सूचना द्यावी. अथवा उल्‍लंघनाची माहिती संबंधीत खात्याला कळवावी.

मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, की  रस्ता सुरक्षा जागृती  ही संकल्पना केवळ सप्‍ताह म्हणून न पाळता  ती वर्षभर राबवण्यात यावी. तरुणांनी  वाहतूक नियमांचे पालन करावे. कोणीही   वाहन बेशिस्तपणे चालवू नये. घरी कोण तरी आपली वाट पाहत आहे  हे त्यांनी ध्यानात ठेवावे. 

रस्ता सुरक्षेत महत्त्वाची  भूमिका बजावल्याबद्दल वाहतूक खात्याचे सहाय्यक संचालक संदीप देसाई  व सहाय्यक संचालक  नंदकिशोर आरोलकर  यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी  देसाई यांनी   रस्ता सुरक्षा या विषयावर   मार्गदर्शन केले.

रस्ता सुरक्षा  सप्‍ताहाच्या उद्घाटन  कार्यक्रमाला  उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन, पोलिस महासंचालक डॉ. मुक्‍तेश चंदर, वाहतूक संचालक   निखिल देसाई,  पणजी मनपाचे महापौर सुरेंद्र फुर्तादो व अन्य उपस्थित होते.