Thu, Apr 25, 2019 15:35होमपेज › Goa › भाजप रॅलीतील विनाहेल्मेटस्वारांवर कारवाई करा

भाजप रॅलीतील विनाहेल्मेटस्वारांवर कारवाई करा

Published On: Jun 03 2018 1:13AM | Last Updated: Jun 03 2018 12:17AMपणजी : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पणजी आणि मडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीत अनेक भाजप कार्यकर्त्यांनी हेल्मेट परिधान न करून कायदा मोडल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गोवा शिवसेना प्रमुख जितेश कामत यांनी पत्रकार परिषदेत केली. 

भाजप युवा मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलित मडगाव व पणजी येथे काही मोटारसायकल चालकांनी हेल्मेट परिधान केले नसल्याबद्दल शिवसेनेने निषेध व्यक्त केला. भाजपचे दामू नाईक, शर्मद रायतूरकर सारख्या नेत्यांना हे शोभत नसून समाजात चुकीचा संदेश पोहोचवण्याचे दुष्कर्म त्यांनी केले आहे, अशी टीका कामत यांनी केली. 

कामत म्हणाले, की मागील भाजप सरकारात काही आमदारांनी अशाच प्रकारे कायद्याचे उल्लंघन करून मोटारसायकलवरून बिना हेल्मेट विधानसभा संकुलात येऊन चुकीचा पायंडा घातला होता. तेव्हा त्यांना दंड आकारून सरकारने लोकांचा राग क्षमवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचीच आता पुनरावृत्ती झाल्याने या कार्यकर्त्यांना फक्त दंड नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. पणजीतील खाण अवलंबितांच्या आंदोलनानंतर ड्रोन आणि छायाचित्रांच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. तशीच  वर्तमानपत्रातील छायाचित्रांद्वारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

चुकार भाजप कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करून कायदा सर्वांसाठी  समान असल्याचे प्रमाण सरकारने देण्याची गरज आहे. पत्रकार परिषदेत विद्यार्थी विभागाचे  मंथन रंकाळे, संकेत रायकर, आशीष कदम, आकाश कांबळे उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शिवसेनेचे माजी विद्यार्थी विभाग प्रमुख चेतन पेडणेकर यांनी शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे. गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, राज्य सरचिटणीस मिलिंद गावस आणि राज्य सचिव अमोल प्रभूगावकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांची युवा विभाग संघटकपदी आणि विद्यार्थी विभाग प्रभारीपदी नेमणूक केली आहे. विकास कुडतरकर यांची विद्यार्थी संघटकपदी नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सचिव अमोल प्रभूगावकर यांना युवा विभाग प्रभारीपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.