Tue, Jul 16, 2019 12:07होमपेज › Goa › वाहन परवाने निलंबनाबाबत वाहतूक खाते संभ्रमात

वाहन परवाने निलंबनाबाबत वाहतूक खाते संभ्रमात

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 30 2018 1:38AMपणजी : प्रतिनिधी  

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करणे पोलिसांनी थांबवले नसल्याने राज्यातील वाहनचालक संतप्त झाले आहेत. वाहतूक खातेही या निर्णयाबाबत गोंधळात पडले असून, या निर्णयाबाबत राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांच्याकडे खात्याने सल्ला मागितला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

राज्यातील रस्त्यांवर वेगाने वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, मद्यपान करून वाहन चालवणे आदी अनेक गंभीर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच त्यांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीने वाहतूक नियंत्रणाचे काम करणार्‍या वाहतूक खाते व पोलिसांना नुकतीच केली होती.

वाहनचालकांवर नियम उल्लंघनप्रकरणी कारवाई केल्यानंतर  परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केल्याने एकाच गुन्ह्यासाठी  वाहनचालकांना दुप्पट दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे सदर निर्णयाविषयी सरकारने कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील कारवाई करण्याचे वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी जाहीर केले होते. कायदेशीर सल्ला मिळेपर्यंत वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी पोलिसांकडून  वाहतूक खात्याला पाठवण्यात आलेले प्रस्ताव स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आदेश संचालक देसाई यांनी 20 एप्रिल रोजी दिला आहे. मात्र वाहतूक पोलिसांना अजून  याविषयी काहीही कळवण्यात आले नसल्याचे वरीष्ठ पोलिस  अधिकार्‍यांनी सांगितले. वाहतूक खात्याने सदर निर्णय घेण्याबाबत विचार करण्याबाबत दहा दिवस झाले तरी चुकार वाहन चालकांना दंड  ठोठावूनही त्यांचे वाहन परवाने जप्त केले जात असल्याने वाहन चालक नाराज झाले आहेत. 

वाहनचालकांना नाहक मनस्ताप 

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यासाठीचे सुमारे 800 प्रस्ताव  पोलिसांकडून वाहतूक खात्याकडे पाठवले गेले आहेत. काहीजणांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबितदेखील करण्यात आले असून, ते अडचणीत आले  आहेत. काही गोमंतकीय अन्य राज्यांत कामाला असून, त्यांना देण्यात आलेले तात्पुरते वाहन परवाने अन्य राज्यांत ग्राह्य धरले जात नसल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत.