Tue, May 21, 2019 19:01होमपेज › Goa › खुन्याच्या अटकेशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही

खुन्याच्या अटकेशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही

Published On: Mar 01 2018 1:42AM | Last Updated: Mar 01 2018 12:28AMपणजी : प्रतिनिधी

जोवर सूर्यकांतच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या हेमंतला अटक करत नाही तोवर  मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा घेऊन सूर्यकांत देसाई यांच्या कुटुंबीयांसह  स्थानिकांनी कुडचडे पोलिस स्थानकासमोर बुधवारी  धरणे धरले. 

सूर्यकांतची पत्नी श्रेया, वडील विठोबा, मुले श्रीशा आणि श्रेयांक तसेच शेळवण येथील स्थानिकांनी जोवर खुन्याला अटक होत नाही, तोवर सूर्यकांतचा मृतदेह स्वीकारणार नाही, असे पोलिसांना सांगून सकाळपासून धरणे धरले.

केवळ संरक्षक भिंतीला  दगड व्यवस्थित बसवा, असे कामगारांना सांगितल्याने शेवंती देसाई हिच्याशी झालेल्या वादानंतर हेमंत देसाई याने टिकावाने सूर्यकांतच्या डोक्यावर पाठीमागून  वार केला होता. जखमी सूर्यकांतचा अतिरक्‍तस्त्रावाने गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हेमंत देसाई फरारी असून अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असलेली सूर्यकांतची 11 वर्षांची मुलगी भीतीच्या सावटाखाली वावरत आहे, असे सांगून घरी आता वृध्द सासर्‍यांशिवाय अन्य कुणीही आधार नसल्याचेे श्रेया देसाई यांनी सांगितले. किती दिवस आपण भीतीच्या सावटाखाली वावरायचे ? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, हेमंत देसाईने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून गुरूवारी (1 मार्च) त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, त्याच्यावर कोणत्याही परिस्थितीत कारवाई करू, असे पोलिस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी सांगितले.शेवंती देसाई हिला 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली असून तिची रवानगी सध्या कोलवाळ तुरूंगात करण्यात आली आहे.