Mon, Jul 15, 2019 23:44होमपेज › Goa › मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर शस्त्रक्रिया

मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर शस्त्रक्रिया

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 11 2018 1:36AMपणजी : प्रतिनिधी

महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाचे प्रमुख नेते आणि परीर्र्कर मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर मुंबईतील एका खासगी इस्पितळात मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर आणखी काही चाचण्या केल्या जात असून त्यांची तब्येत सुधारत आहे. ते येत्या सोमवारपर्यंत राज्यात परततील, अशी माहिती त्यांचे बंधू तथा मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली. 

मंत्री सुदिन ढवळीकर यांना मधुमेह आहे. गेल्या रविवारी ते चेन्नईच्या इस्पितळात आरोग्य तपासणीसाठी गेले होते. तिथून त्यांना काही चाचण्या करून घेण्यासाठी मुंबईच्या ब्रीच कँडी इस्पितळात पाठविले गेले. तिथे सोमवारी त्यांच्यावर काही चाचण्या झाल्या. त्यानंतर त्यांच्यावर  तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. यात गंभीर असे काही नसल्याचे दीपक ढवळीकर यांनी सांगितले. मात्र, नेमका काय आजार आहे ते सांगण्यास  त्यांनी नकार दिला. मात्र, ढवळीकर कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी ढवळीकर यांच्या आजाराचे नेमके निदान होण्यासाठी आधी ‘बायोस्पी’ करण्यात आली असल्याचे सांगितले. 

सुदिन यांच्यासोबत त्यांचे डॉक्टर बंधू संदीप हे मुंबईला गेले आहेत. सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्याने डॉ. संदीप ढवळीकर यांचे प्रसिद्धी पत्रक प्रसृत केले आहे. सुदिन यांचे आरोग्य चांगले आहे. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची तब्येत सुधारत आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी कोणीही अफवा पसरवू नये. गोमंतकीय जनतेच्या आशीर्वादाने ते काही दिवसांतच कामकाज सुरू करणार आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे. 

मगो कार्यकर्त्यांमध्ये चिंता 

गोव्यातील राजकारणात गेली अनेक दशके स्वत:चे स्थान कायम टिकवून ठेवणारे सुदिन ढवळीकर (वय 61) हे गोवा विधानसभेत पाचव्यांदा निवडून आले आहेत. तीनवेळा ते गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले.  सुदिन ढवळीकर इस्पितळात दाखल झाल्याचे वृत्त कळताच मगोपच्या गोव्यातील कार्यकर्त्यांमध्ये व ढवळीकर यांच्या समर्थकांमध्ये त्याविषयी चिंता व चर्चा सुरू झाली.