Wed, Jul 17, 2019 15:58होमपेज › Goa › ‘भारत बंद’ला पाठिंबा, पण सहभाग नाही

‘भारत बंद’ला पाठिंबा, पण सहभाग नाही

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 09 2018 2:11AMपणजी : प्रतिनिधी

महागाईविरोधात राष्ट्रीय काँग्रेसने सोमवार दि. 10 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या ‘भारत बंद’ मध्ये प्रदेश काँग्रेस सहभागी होणार नाही.  मात्र, या  बंदला पाठिंबा देण्यासाठी केवळ   राज्यातील महत्त्वाच्या पेट्रोलपंपांवर पत्रकांचे वाटप करून शांततापूर्ण आंदोलन केले जाईल, असे  काँग्रेसचे उत्तर गोवा अध्यक्ष  विजय भिके यांनी येथील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत  सांगितले. गोव्याच्या जनतेची खरीच काळजी असल्यास  मुख्यमंत्री पर्रीकर यांनी येत्या 24 तासांत पेट्रोलवरील व्हॅट पूर्णपणे हटवून पेट्रोलचे दर कमी करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

भिके म्हणाले, मागील काही वर्षांत महागाई प्रचंड वाढली असून याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे  10 सप्टेंबर रोजी  भारत बंद पुकारण्यात आला आहे. नोटाबंदीमुळे अडचणीत  असलेली जनता महागाईमुळे अधिकच संकटात सापडल्याचेही  त्यांनी सांगितले.

गोमंतकीयांचा प्रिय गणेश चतुर्थी हा सण नजीक आला  असतानाच वाढत्या  महागाईमुळे लोकांसमोर संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे   प्रदेश काँग्रेसने  या भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे. उत्तर गोव्यातील  महत्त्वाच्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीविरोधात पत्रकांचे वाटप करून शांततापूर्ण रीतीने आंदोलन केले जाईल. उत्तर गोव्याप्रमाणेच दक्षिण गोव्यातदेखील ते केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यात भाजप सरकार सत्तेत आले तेव्हा पेट्रोलचे प्रतिलिटर दर 60 रुपयांहून अधिक केले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले होते. मात्र,  पेट्रोलच्या दराने सध्या 70 रुपयांची सीमा पार केली आहे. अशा स्थितीत जनतेला दिलासा मिळणे आवश्यक आहे. यासाठी पेट्रोलवरील व्हॅट रद्द करून पेट्रोलचे दर कमी करावेत, अशी मागणीही भिके यांनी केली. सुभाष केरकर, नझिर, शिरीष हळदणकर, विशाल वळवईकर, भोला घाडी व अन्य उपस्थित होते.