होमपेज › Goa › राज्याच्या नेतृत्वासाठी यापुढे सुदिन यांनाच ‘मगो’चा पाठिंबा

राज्याच्या नेतृत्वासाठी यापुढे सुदिन यांनाच ‘मगो’चा पाठिंबा

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 11 2018 12:35AMफोंडा : प्रतिनिधी

राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांना नामशेष करण्याचा प्रयत्न करीत असतानादेखील ‘मगो’ पक्षाने गेली 55 वर्षे विधानसभेत आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. राज्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाच ‘मगो’ पक्षाने पाठिंबा दिला आहे. मात्र, यापुढे राज्याच्या नेतृत्वासाठी सुदिन ढवळीकर यांनाच ‘मगो’चा पाठिंबा असणार आहे, असे प्रतिपादन मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केले. 

फर्मागुडी येथील गोपाळ गणपती सभागृहात आयोजित केलेल्या ‘मगो’च्या स्थापना दिन कार्यक्रमात दीपक ढवळीकर बोलत होते. व्यासपीठावर बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, आमदार दीपक पाऊसकर, माजी आमदार नरेश सावळ, लवू मामलेदार, रोहिदास नाईक, नारायण सावंत, गजानन तिळू नाईक आदी उपस्थित होते. 

सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, ‘मगो’ हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. ‘मगो’ पक्षाने दिलेले व्यासपीठ कधीच विसरणार नाही. पक्षाचे विलिनीकरण करण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही. यापूर्वी दोन वेळा उपमुख्यमंत्री पदाची ऑफर आली होती. मात्र, आपण तसा विचार कधी केला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत काही चुकांमुळे फक्त तीन आमदार निवडून आले. परंतु, यापुढे 21 आमदार  निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

माजी आमदार नरेश सावळ यांनी सांगितले की,  विद्यमान सरकारमधील काही आमदार असंतुष्ट आहेत. त्यामुळे गोव्याचे नेतृत्व योग्य व्यक्तीकडे सोपविण्याची गरज आहे. सध्या राज्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. खाणी बंद झाल्यास बेरोजगारीची समस्या डोके वर काढणार आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे नेतृत्व सोपविणे आवश्यक आहे. ‘मगो’ पक्षाला मिळणारा पाठिंबा पाहिल्यास येणार्‍या निवडणुकीनंतर गोव्याचे नेतृत्व ‘मगो’कडेच येणार आहे. 

आमदार दीपक पाऊसकर यांनी सांगितले की, गोव्यात अनेक समस्यांचे निवारण करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. राज्य व केंद्र सरकारने संघटित राहून प्रयत्न केल्यास एका वर्षात खाणीचा प्रश्न सुटून आलेले संकट दूर होणार  आहे.   

रोहिदास नाईक यांनी सांगितले की, ‘मगो’चे कार्य भाऊसाहेब बांदोडकरांनंतर मंत्री सुदिन ढवळीकर चांगल्या प्रकारे  पुढे नेत आहेत. त्यामुळे लोकांना पक्षाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भविष्यात इतर पक्षांशी युती करताना नेत्यांनी सावधगिरी बाळगावी.

माजी आमदार लवू मामलेदार, नारायण राटवड यांनीही आपले विचार मांडले. स्थापना दिनानिमित्त अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आला. नारायण सावंत यांनी स्वागत केले. महेश पणशीकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन नितीन कोलवेकर यांनी केले.