Tue, Mar 26, 2019 19:57होमपेज › Goa › गोवा विविध आघाड्यांवर यशस्वी :  रामनाथ  कोविंद

गोवा विविध आघाड्यांवर यशस्वी :  रामनाथ  कोविंद

Published On: Jul 08 2018 1:43AM | Last Updated: Jul 08 2018 1:43AMपणजी : प्रतिनिधी

गोवा केवळ पर्यटनस्थळ म्हणून प्रसिध्द नसून आंतरराष्ट्रीय  कार्यक्रमांचेही यशस्वी आयोजन  येथे होते.  गोवा सरकारकडून शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण, महिला सशक्‍तीकरण, माहिती तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रात  उत्कृष्ट काम  सुरू असून या  प्रत्येक आघाडीवर  गोवा  अग्रगण्य  असल्याचे   गौरवोद‍्गार राष्ट्रपती  रामनाथ  कोविंद यांनी काढले.  दोनापावला येथील एनआयओ  सभागृहात  शनिवारी राज्य सरकारतर्फे आयोजित  नागरी सत्काराला उत्तर देताना राष्ट्रपती बोलत होते. 

राष्ट्रपती   कोविंद यांचा यावेळी  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते  स्मृतिचिन्ह, मानपत्र तसेच शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.व्यासपीठावर  राष्ट्रपती कोविंद यांच्या पत्नी तथा प्रथम महिला  सविता कोविंद, राज्यपाल मृदुला सिन्हा,   काँग्रेसचे आमदार  प्रतापसिंह राणे, सभापती  डॉ.प्रमोद सावंत व पणजी मनपा महापौर  विठ्ठल चोपडेकर उपस्थित होते.  ‘माझ्या मोगाळ गोंयकारांनो’अशा  शब्दात राष्ट्रपती  कोविंद यांनी   भाषणास सुरुवात करताच  उपस्थितांनी  टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रपती कोविंद  म्हणाले,  गोव्याकडे केवळ  देशीच नव्हे तर  जगभरातील लोक आकर्षित होतात.गोव्याचे हे वैशिष्ट्य आहे.यापूर्वी आपण गोव्यात आलो.मात्र राष्ट्रपती या नात्याने गोव्याचा हा आपला पहिला दौरा आहे.  गोव्यात येऊन छान वाटते.  मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर हे  देशाचे संरक्षणमंत्री  होते. ही बाब गोमंतकीयांसाठी गौरवास्पद आहे. पर्यटन क्षेत्राबरोबरच   गोव्याची ओळख  व्यापार केंद्र  म्हणूनही  असल्याचे त्यांनी सांगितले.  

जगभरातील लोकांना आवडणारे पर्यटनस्थळ असण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), 2016 साली आयोजित  ब्रिक्स महोत्सव,  असे  अनेक  आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यक्रमांचे आयोजन येथे यशस्वीपणे करण्यात आले आहे.  याशिवाय  गोवा सरकारकडून शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण, महिला सशक्‍तीकरण, माहिती तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रात  उत्कृष्ट काम  सुरू आहे. गोवा या  प्रत्येक आघाडीवर अग्रगण्य  असल्याचेही त्यांनी  सांगितले. पणजीची निवड ‘स्मार्ट सिटी’ साठी करण्यात आली आहे.  

राज्य सरकारकडून  राज्यात अनेक  विकासकामे राबवली जात असून सरकारचे काम कौतुकास्पद  असल्याचेही राष्ट्रपती कोविंद  यांनी सांगितले. नागरी  सत्कार  समारंभाची सुरुवात  गोव्याचे वर्णन करणार्‍या  गाण्याने करण्यात आली.  आयएएस अधिकारी अमेय अभ्यंकर यांनी  राष्ट्रपती कोविंद यांचा परिचय करून दिला.

राष्ट्रपती भवन देशवासीयांचे ः राष्ट्रपती

राष्ट्रपती  या नात्याने आपण देशाचे प्रथम नागरिक ठरतो. परंतु राष्ट्रपती भवन हे केवळ  आपले नसून देशाच्या  सर्व नागरिकांचे आहे. तुम्हा सर्वांनी तेथे यावे. राष्ट्रपती भवनात  तुमचे स्वागत आहे,असे  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी  सांगितले.

गोवा इतरांसाठी मॉडेल ठरावे ः पर्रीकर

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले,  गोवा दौर्‍यावर आलेले  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या  सहकार्याने गोव्याची प्रगती होत आहे.  गोवा सरकार जनतेच्या कल्याणासाठी काम करीत आहे.  खाणबंदी लागू झाल्यानंतर देखील   विकासकामांवर परिणाम झालेला नाही. गोवा हे  विकासाबाबत अन्य राज्यांसाठी   मॉडेल ठरावे, यासाठी आपले प्रयत्न आहेत.