Thu, Jun 27, 2019 09:42



होमपेज › Goa › द.गोव्यातील विद्यार्थ्यांना खपवाव्या लागतात लॉटर्‍या!

द.गोव्यातील विद्यार्थ्यांना खपवाव्या लागतात लॉटर्‍या!

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 12:06AM

बुकमार्क करा





मडगाव ः प्रतिनिधी

बाल हक्क कायद्यान्वये अल्पवयीन मुलांना कामावर ठेवता येत नाही. मात्र, दक्षिण गोव्यातील काही शैक्षणिक संस्थांनी सणांचा मुहूर्त साधून हायस्कूलमधील अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या हातात लॉटरी कुपन्स देऊन त्या खपविण्यासाठी लोकांच्या दारात पाठविण्यास सुरुवातकेली आहे. त्यामुळे सर्वत्र हा चर्चेचा विषय बनला आहे.

डिसेंबर महिना सुरू झाला, की काही विद्यालयांकडून त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हातात लॉटरी कुपन्स देऊन त्याच्या विक्रीसाठी दबाव आणला जातो. यावेळीसुद्धा सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या हातात लॉटरी कुपन्स देऊन त्यांना बाजारात त्यांची विक्री करण्यासाठी पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. केपे तालुक्यातील तिळामळ आणि कुडचडे भागांतील काही विद्यार्थ्यांना विद्यालयाकडून लॉटरी कुपन्स देऊन विद्यार्थ्यांना बाजारात पाठविण्यात आले आहे.

नाताळापूर्वी देणगी कुपन्सची विक्री करून त्याच्या मोबदल्यात मिळणारे पैसे व्यवस्थापनाला देण्यास सांगितले आहे, अशी माहिती एका विद्यार्थ्याने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली.एका शाळा व्यवस्थापकाने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाती डोनेशन घेण्यासाठी एक फॉर्म दिले असून यावर देणगी देणार्‍याचे नाव आणि फोन क्रमांक नमूद करण्यास सांगितले आहे. गुरुवारी एका हायस्कुलचे विद्यार्थी शाळेच्या गणवेशात डोनेशन मागत असल्याचे दिसून आले.

एका शाळेच्या मुख्याध्यापकांशी या विषयी चर्चा केली असता या देणगी कुपन विक्रीच्या प्रकारात शाळा व्यवस्थापनाचा कोणताच हात नसून पालक शिक्षक संघटनेकडून लॉटरी विक्री आणि डोनेशनचा विषय हाताळला जात असल्याचे त्यांनी सांगितले. बक्षीस स्वरूपात तीन मोठ्या भेटवस्तू व पाच उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातात. या विषयी बायलांचो एकवोटच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी सांगितले, की बाल कायद्यान्वये हा प्रकार बेकायदा आहे. संबंधित  विद्यार्थ्यांना आपल्या पालकाकडून डोनेशन आणायला लावले असते तर त्यात हरकत घेण्यासारखे काहीच नव्हते. मात्र, विद्यार्थी बाजारात फिरून  डोनेशन घेत आहेत, हे योग्य नाही. आपण संंबंधित शाळा व्यवस्थापनाशी व शिक्षकांना या संबंधी पत्र लिहिले जाईल.