Fri, May 24, 2019 02:26होमपेज › Goa › हवेली पंचायत कार्यालयावर स्थानिकांची धडक 

हवेली पंचायत कार्यालयावर स्थानिकांची धडक 

Published On: Mar 22 2018 1:42AM | Last Updated: Mar 22 2018 12:10AMफोंडा : प्रतिनिधी

कुर्टी  येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनी उभारण्यात येणार्‍या मलनिस्सारण प्रकल्पाला विरोध दर्शवित स्थानिकांनी बुधवारी घेत हवेली पंचायत कार्यालयावर धडक मोर्चा  नेला.  सरपंच व अन्य पंचायत सदस्यांशी सुमारे तीन तास चर्चा करून या ठिकाणी सुरु असलेले काम बंद करण्याचे पत्र घेतल्यानंतर ग्रामस्थ माघारी परतले.पंचायतीने मलनिस्सारण प्रकल्पासाठी 2014 साली  दिलेल्या ना हरकत दाखल्याचा गैरवापर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. 

हाऊसिंग बोर्ड कॉलनीत भर लोक वस्तीत मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यात स्थानिक व परिसरातील लोकांचा विरोध आहे. गेल्या ग्रामसभेत पंचायतीने प्रकल्पाला दिलेला परवाना मागे घेण्याचा  ठराव  घेण्यात  आला  होता. मात्र, पंचायतीने व्यवस्थित पाठपुरावा केला नसल्याने संतापलेल्या सुमारे 100 लोकांनी हवेली येथील पंचायत कार्यालयाकडे धाव घेतली. सरपंच रुक्मा खांडेपारकर, उपसरपंच शैलेश शेट, संतान फर्नांडीस, दादी नाईक, सुधीर राऊत, शर्मिला सागावकर, श्रवणी गावडे व गुरुदास खेडेकर पंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. 

ग्रामस्थांनी सरपंच व अन्य पंचायत सदस्यांकडे काम त्वरित बंद करण्याची मागणी केली. ग्रामसभेत मलनि:सारण प्रकल्पाला दिलेला परवाना मागे घेण्याचा ठराव घेतल्यामुळे  मलनिस्सारण मंडळाने पंचायती विरुद्ध पंचायत संचालकांकडे दाद  मागितली आहे. त्यामुळे हे काम पंचायत बंद करू शकत नसल्याचा दावा सरपंचांनी केला. मात्र, उपस्थित ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत पंचायतीकडून लेखी आश्‍वासन मिळणार नाही, तोपर्यंत पंचायत कार्यालायात ठाण मांडून बसण्याचा इशारा दिला. त्यामुळे शेवटी सरपंच व पंचायत  सदस्यांनी चर्चा करून मलनिस्सारण प्रकल्प मंडळाला काम बंद ठेवण्यासंबंधी पत्राची प्रत लोकांना दाखविल्यानंतर ग्रामस्थ माघारी परतले. 

हाऊसिंग बोर्ड कॉलनीचे अध्यक्ष प्रकाश सावंत यांनी सांगितले, की पूर्वीच्या पंचायत मंडळाने 2014 साली कॉलनीचा प्रश्‍न  सोडविण्यासाठी फक्‍त कॉलनीपुरता मर्यादित मलनिस्सारण प्रकल्प उभारण्याचा ठराव घेतला होता. मात्र, त्या ठरावाचा दुरुपयोग केला गेला आहे. मलनि:सारण प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध नाही. फक्‍त भर लोक वस्तीत प्रकल्प उभारण्यात लोक विरोध  करीत आहेत.  

उंडीर येथे लोकांचा विरोध ओळखून याठिकाणी मोठा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी लोकांच्या समस्येच्या मागणीची दाखल घेऊन प्रकल्प इतर ठिकाणी उभारावा, अशी मागणी माजी पंचायत सदस्य नरेंद्र परब यांनी केली. 

उपसरपंच शैलेश शेट यांनी सांगितले, की भर लोक वस्तीत प्रकल्प उभारण्यास आपला विरोध असणार आहे. भविष्यात तांत्रिक कारणामुळे प्रकल्पाचा दुष्परिणाम स्थानिक लोकांना जाणवणार आहे. सरपंच रुक्मा खांडेपारकर यांनी सांगितले, की सदर प्रकल्पाचे सध्या सुरु असलेले काम बंद करण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प महामंडळास पत्र पाठविण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार 2014 साली पंचायत मंडळाने घेलेल्या ठरावासंबंधी बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे.