Fri, Jul 19, 2019 07:28होमपेज › Goa › रोजगार निर्मितीवर राज्य सरकारचा भर

रोजगार निर्मितीवर राज्य सरकारचा भर

Published On: Jul 17 2018 1:33AM | Last Updated: Jul 16 2018 11:24PMपणजी : प्रतिनिधी

गोमंतकीय युवकांना रोजगार उपलब्ध करण्यावर राज्य सरकारचा भर आहे. सरकारी नोकरी भरतीवरील निर्बंध उठवून येत्या ऑगस्टमध्ये  सुमारे 1000 ते 1200 पदांसाठी जाहिराती प्रसिध्द केल्या जाणार आहेत. औद्योगिक आणि आयटी धोरणाच्या माध्यमातून डिसेंबरपर्यंत 4 ते 5 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

येथील मळा येथे कम्युनिटी सेंटरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री पर्रीकर बोलत होते. पर्रीकर म्हणाले की, सरकारी खात्यात मागील वर्षभरापासून  नोकर भरती झालेली नाही. हे निर्बंध हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ऑगस्टनंतर सरकारी रोजगारांची हजार ते बाराशे संधी युवकांना मिळणार आहेत. राज्यात पर्यटन क्षेत्रात मागील पाच वर्षात पर्यटकांची संख्या 27 लाखांवरून 80 लाखांवर पोहचली आहे. हॉटेलांची आणि खोल्यांची संख्याही दुपटीने वाढली असून या क्षेत्रात 8 ते 10 हजार जणांना रोजगार  उपलब्ध झाला असा अर्थ त्यातून काढला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंजाब, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यातच सुमारे 1.50 कोटी रोजगार उपलब्ध करून विरोधकांच्या अपप्रचाराला चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीतही गोव्यातील दोन्ही मतदारसंघातून भाजपचेच उमेदवार निवडून येणार आहेत, हे नक्की आहे. मात्र, त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी  येत्या 8 ते 9 महिने जीवाचे रान करून काम केले पाहिजे. यासाठी युवा, मध्यमवर्गीय, अल्पसंख्याक आणि महिलांना भाजपच्या कार्याची आणि विकासकामांची माहिती पोहचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या आणि फसव्या बातम्या समाजात पसरवण्याच्या  विरोधकांच्या कारवायांना तोंड देण्याची भाजप कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी. भावी पिढीच्या उत्तम भवितव्यासाठी  पंतप्रधान मोदी यांचे सरकार पुन्हा केंद्रात येणे आवश्यक असून गोव्यातून दोन खासदार मोदी यांच्या सहाय्यासाठी पाठवा, असे आवाहनही मुख्यमंत्री पर्रीकरांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. 

विरोधी काँग्रेसवर थेट हल्ला चढवून माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीच 2011 साली प्रादेशिक आराखडा अधिसूचित केला असून आता तेच आराखडा रद्द करण्याची मागणी कशी करत आहेत, अशी विचारणा मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केली. ते म्हणाले, राज्यात कॅसिनोंना परवानगी देणे, एमपीटीमध्ये कोळसा हाताळणी सुरू करणे, हे काँग्रेस राजवटीतच झाले. उद्योजक विजय मल्ल्या व  नीरव मोदी यांना काँग्रेसनेच आसरा दिला होता. काँग्रेसने केलेले मागील पाच वर्षांतील पाप भाजपला निस्तरावे लागत असल्याची टीकाही त्यांनी केली. भाजपने मागील काही वर्षांत काही चुका केल्या आणि महत्वाच्या बाबींवर दुर्लक्ष केल्याने भाजप आमदारांचे संख्याबळ 21 वरून 13 वर घसरले. आता या चुका सुधारून नव्याने समाजाला विश्‍वासात घ्यावे लागेल, त्यासंदर्भात भाजप कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली असल्याचे मत आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आरोग्याच्या कारणास्तव आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पूर्वीप्रमाणे जोरदार प्रचार  अथवा बैठकांना हजेरी लावणार नाहीत. त्यामुळे राज्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या मतदारसंघात जोमाने काम करावे, असे आवाहन  भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर  यांनी केले. या मेळाव्याला खासदार नरेंद्र सावईकर, आमदार नीलेश काब्राल, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार दयानंद मांद्रेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

...पर्रीकर झाले भावूक 

अमेरिकेतून स्वादूपिंडाच्या आजारपणातून सुमारे तीन महिन्यांनी परत आलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सभागृहात गर्दी केली होती. यामध्ये महिलांची संख्या मोठी होती. पर्रीकर व्यासपीठावर आल्यानंतर सभागृहातील अनेक कार्यकर्त्यांनी पर्रीकरांची छबी मोबाईलमध्ये टिपण्यास प्रारंभ केला. पर्रीकर यांनी पहिलाच शब्द उच्चारल्यावर सर्व  भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. या स्वागताने भारावलेल्या पर्रीकर यांचा आवाज कातर झाला व डोळ्यांत अश्रू तरळले.  

‘सर्जिकल स्ट्राईक’च्यावेळी राहुल गांधींना न्यायला हवे होते का ?: पर्रीकर 

पाकव्याप्त काश्मीर भागात सर्जिकल स्ट्राईक झालाच नसल्याची टीका काँग्रेसने केली होती. या टीकेला प्रथमच  माजी संरक्षणमंत्री  तथा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उत्तर दिले. भारताची ही अत्यंत उच्च पातळीवरील गोपनीय मोहीम होती. ती आखण्यासाठी काही महिने आधीपासून तयारी करण्यात आली होती. असा हल्ला केला जाणार याची कल्पना आपण, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नौसेनेचे प्रमुख, मिलिटरी संचालक आदी पाच सहा जणांनाच दिली होती. राहुल गांधी यांना या कारवाईवेळी लष्करासोबत  नेले असते तर, काँग्रेसला विश्‍वास बसला असता का, असा टोमणा पर्रीकर यांनी यावेळी हाणला.