होमपेज › Goa › ‘स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण’च्या राज्यपालांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

‘स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण’च्या राज्यपालांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 12 2018 11:57PMपणजी : प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्यदिनी येत्या 15 ऑगस्ट  रोजी पणजीतील जुन्या सचिवालयासमोर होणार्‍या सोहऴ्यात तिरंगा फडकविण्याची जबाबदारी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे देण्यात आल्याने राज्य सरकारातील सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये व  प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, या विषयावर उघड बोलण्यास कोणाचीही तयारी नसल्याचे आढळून आले आहे. याविषयावर राज्यपाल मृदूला सिन्हा काय निर्णय घेतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने उपचारांसाठी अमेरिकेला गेले आहेत. त्यांनी जाताना ध्वजारोहणच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहण्याचा अधिकार सभापती सावंत यांना दिल्याने काही राजकीय मंंडळी वाद करीत आहेत. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर  यांनी स्वत: राज्यपालांनी यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त होणार्‍या कार्यक्रमात तिरंगा ध्वज फडकवावा, अशी लेखी मागणी केली आहे. काँग्रेसने शनिवारी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे, की  भारतीय स्वातंत्र्य दिन हा अत्यंत महत्वाचा दिवस असून त्या दिवशी होणार्‍या राष्ट्रीय सोहऴ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोव्यात उपस्थित असू नये ही दुर्दैवी गोष्ट आहे.स्वातंत्र्यदिन नजरेसमोर ठेवून पर्रीकर यांना त्यांच्या अमेरिका भेटीविषयी योग्य पद्धतीने नियोजन करता आले असते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत दुसर्‍या एकाद्या मंत्र्याकडे जबाबदारी न देता सभापतींकडे सोपवून पर्रीकर यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे.

सभापती ही एक स्वतंत्र संस्था असते व त्यांना सरकारच्या कामकाजाशी काही देणोघेणे नसते. सरकारमधील एखादा ज्येष्ठ मंत्री किंवा अन्य कोणत्याही मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकविण्याची जबाबदारी द्यायला हवी होती.  विद्यमान सरकारमध्ये काही ज्येष्ठ मंत्री आहेत, तरी देखील मंत्र्यांकडे तिरंगा फडकविण्याचा मान न सोपविता पर्रीकर यांनी सभापतींकडे तो सोपवला. याची दखल राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी घ्यावी व राज्यपालांनी स्वत: तिरंगा फडवून शान राखावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.

यासंबंधी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कुणालाही विश्‍वासात न घेता सदर निर्नय घेतला  असल्याचे काही मंत्र्यांचे म्हणणे आहे.  स्वातंत्र्यदिनाच्या तालुकास्तरावर होणार्‍या कार्यक्रमात स्थानिक मंत्री झेंडा फडकावणार आहेत. नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा आजारी असल्याने यावेळी म्हापशात तिरंगा फडकवणार नसून तिथे महसूल मंत्री रोहन खंवटे ध्वज फडकवतील. कृषीमंत्री विजय सरदेसाई मडगावच्या कार्यक्रमाला हजर असणार आहेत. आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे विदेशात असल्याने वाळपईच्या मामलतदारांच्या हस्ते तिरंगा फडकविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.