Wed, Apr 24, 2019 08:24होमपेज › Goa › भाजपकडून लोकशाहीचा अनादर

भाजपकडून लोकशाहीचा अनादर

Published On: May 20 2018 1:41AM | Last Updated: May 20 2018 12:27AMपणजी : प्रतिनिधी

काँग्रेसने लोकशाही मार्गानेच  राज्यपालांची भेट  घेतली. त्यामुळे  या गोष्टीवरुन काँग्रेसचा निषेध करणारे भाजप  लोकशाहीचा अनादर करीत असल्याचे स्पष्ट होते, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते अ‍ॅड. यतिश नाईक यांनी पणजीत पत्रकार परिषदेत केली. भाजपने काँग्रेसवर विनारकरण टीका करू नये. त्यांच्याकडून केली जाणारी टीका ही पोकळ असून त्याला कुठलाही आधार नसल्याचेही ते म्हणाले.

अ‍ॅड. नाईक म्हणाले, की 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा प्राप्‍त करुन सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी देण्याची मागणी   राज्यपालांची भेट घेऊन लोकशाही मार्गाने  करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसच्या या कृतीचा भाजपचे खासदार तथा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक व दक्षिण गोव्याचे खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांनी निषेध केला. मात्र, प्रत्यक्षात  त्यांनी   गोव्यातील नेतृत्वहीन सरकार, मागील दोन महिन्यांपासून  मंत्रीमंडळ बैठक न होणे या गोष्टीचा निषेध करणे अपेक्षित होते, असे त्यांनी सांगितले.

या दोन्ही खासदारांनी आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात गोव्यातील महत्वाचे मुद्दे संसदेत मांडले नाहीत. त्यांचे कार्य काय हे कुणालाच ठाऊक नाही. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत हंगामी मुख्यमंत्री नेमणे आवश्यक होते. परंतु  तसे  काहीच करण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील प्रशासन कोलमडले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जनता धडा शिकवणार, असेही ते म्हणाले.

काँग्रेसकडून नौटंकी केली जात असल्याचा आरोप भाजप  करीत आहेत.  नौटंकी काँग्रेस नव्हे तर भाजप करीत आहेत. भाषा माध्यम, कॅसिनो,  या सारख्या महत्वाच्या मुद्यांवर त्यांनी यु टर्न मारला  असल्याचीही टीका अ‍ॅड. नाईक यांनी केली.  विजय पै, प्रसाद आमोणकर व  शिवराज  तारकर उपस्थित होते.