Fri, Jul 19, 2019 07:05होमपेज › Goa › खाण लिजांची लिलाव प्रक्रिया सुरू करा

खाण लिजांची लिलाव प्रक्रिया सुरू करा

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 25 2018 11:56PMपणजी : प्रतिनिधी

ज्या खाण लिजांचा परवाना कालावधी 2020 साली संपुष्टात येणार आहे, त्या लिजांची लिलाव प्रक्रिया जुलै 2019 पासून सुरू करावी, असे निर्देश केंद्रीय खाण मंत्रालयाने  गोव्यासह सर्व राज्य सरकारांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देशातील सुमारे 15 राज्यांनी ही लिलाव प्रक्रिया सुरू करण्यासाठी   123 मिनरल ब्लॉक्सची पाहणी केली आहे. या संदर्भातील समन्वय समितीची मागील महिन्यात बैठक पार पडली. या बैठकीत गोव्यासह अन्य 15 राज्ये सहभागी झाली होती. या बैठकीत केंद्रीय खाण सचिव अनिल मुकीम यांनी ज्या खनिज लिजांचा परवाना कालावधी 2020 साली संपुष्टात येणार आहे, त्या लिजांची यादी तयार करण्याचे काम डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी संबंधित खनिज लिजांची लिलाव प्रक्रिया जुलै 2019 पासून सुरू करावी. जेणेकरून  खनिजांची कमतरता भासणार नाही. तसेच   विद्यमान खनिज लिजधारक व खनिज लिजांच्या लिलावानंतर या लिजेस ताब्यात घेणार्‍या नव्या लिजधारकामध्ये व्यवहार योग्य पद्धतीने होईल,  असेही त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लिलाव प्रक्रियेच्या स्तरावर पोहचलेल्या अशा खनिज लिजांची यादीही तयार करण्याचे निर्देश या बैठकीत खाण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांना देऊन त्यांना ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाने  7 फेब्रुवारी 2018 रोजी दिलेल्या एका निवाड्यात राज्यातील 87  खनिज लिजांचे नूतनीकरण करण्यात आलेले परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे गोव्यातील खनिज लिजेस हे लिलावासाठी उपलब्ध आहेत. 

...तर खाण व्यवसायाला दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने खनिज लिजांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश दिल्यानंतर खाण अवलंबितांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील खाणी पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी वेळावेळी त्यांच्याकडून राज्य तसेच केंद्र सरकारकडे केली जात आहे. त्यामुळे  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीदेखील ही मागणी केंद्रातील भाजप सरकारकडे मांडली आहे. त्यामुळे जर गोव्यातील खनिज लिजांचा लिलाव झाल्यास खाण व्यवसाय पुन्हा सुरू होण्यास मदत मिळेल. तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांनादेखील दिलासा मिळण्याची आशा व्यक्‍त केली जात आहे.