Wed, Aug 21, 2019 02:42होमपेज › Goa › गोंयच्या सायबाच्या फेस्तासाठी राज्य सज्ज

गोंयच्या सायबाच्या फेस्तासाठी राज्य सज्ज

Published On: Dec 02 2017 12:25AM | Last Updated: Dec 02 2017 12:05AM

बुकमार्क करा

पणजी ः प्रतिनिधी

जुने गोवे येथे दि. 4 डिसेंबर रोजी होणार्‍या सेंट फ्रान्सिस झेविअरच्या फेस्तासाठी म्हणजेच गोंयच्या सायबाच्या फेस्तासाठी चर्च परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून सर्व सरकारी यंत्रणेसह राज्य सज्ज झाले आहे.

दरवर्षीप्रमाणे, यंदाही देश-विदेशातील भाविक सायबाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळमधील भाविक चर्चपर्यंत चालत येतात आणि मासच्या दिवशी सेंट झेविअरचे दर्शन घेतात. पोर्तुगाल, इटली व अन्य देशांतील लोकही फेस्तात सहभागी होतात. भाविकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशव्दारावर ‘मेटल डिटेक्टर’ बसविण्यात आली आहे. 

फेस्तासाठी 25 नोव्हेंबरपासून ‘नोव्हेनाला’ सुरुवात झाली आहे. ‘नोव्हेनात’ सहभागी होणार्‍या भाविकांसाठी भव्य मंडप उभारला आहे. नोव्हेना सुरू झाल्यापासून चर्च परिसरात भाविकांची गर्दी वाढली आहे. ‘बाय फेत लाइक,सेंट फ्रान्सिस झेविअर, टू लाईफ इन अ‍ॅब्युडन्स’ अशी या वर्षीची ‘नोव्हेनाची’ थिम आहे. नोव्हेना मास 2 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. मराठी, कोकणी, इंग्रजी, हिंदी, तमिळ, कन्नड आणि तेलगु या व्यतिरिक्त फ्रेंच, पोर्तुगीज आणि स्पॅनिश भाषांमध्ये चर्च परिसरात ‘मास’ (प्रार्थना) होत आहेत. 4 डिसेंबर रोजी होणार्‍या फेस्ताच्या दिवशी सकाळी 4, 5, 6, 7,8 आणि 9 वाजता मास होईल.यानंतर 9.30 वाजता बिशप अनिल कुतो, आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव, आर्चविशप  एमिरटस गोन्साल्विस आणि सिंधुदुर्गचे बिशप एल्विन बार्रेटो हे मुख्य प्रार्थना करतील.
सायबाच्या फेस्तासाठी सुमारे 150 स्थानिक स्वयंसेवक नोव्हेना सुरू झाल्यापासून सेवा बजावत आहेत. फेस्तादिवशी या स्वयंसेवकांना अन्य राज्यातील स्वयंसेवक सहकार्य करतील.