Sat, Jul 20, 2019 10:39होमपेज › Goa › भरधाव वाहनांवर नियंत्रणासाठी‘स्पीड रडार गन्स’ 

भरधाव वाहनांवर नियंत्रणासाठी‘स्पीड रडार गन्स’ 

Published On: Mar 14 2018 1:25AM | Last Updated: Mar 14 2018 1:08AMपणजी : प्रतिनिधी

वाहनांच्या  भरधाव  वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोवा वाहतूक पोलिस ‘स्पीड रडार गन्स’ची मदत घेणार असून हे गन्स वेगवान वाहनांची छायाचित्रे टिपणार आहे. या छायाचित्रांच्या आधारे संबंधित वाहन चालकाला दंड ठोठावणे शक्य होणार आहे. पोलिसांच्या दिमतीला 4 स्पीड रडार गन्स दाखल झाल्या आहेत. मद्यपी वाहनचालकांच्या तपासणीसाठी  100 अल्कोमीटर खरेदी केल्याची माहिती पोलिस महासंचालक डॉ. मुक्‍तेश चंदर यांनी  दिली. 

 डॉ. चंदर म्हणाले, स्पीड रडार गन्सचा प्रायोगिक तत्त्वावर वापर दोनापावला येथे सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत काही वाहन चालकांना चलनदेखील देण्यात आले.  राज्यभरात  या गन्सचा वापर करण्यात येणार आहे.  अतिवेगाने वाहन चालवणे, मद्यपान करुन वाहन चालवणे यामुळे रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे   या दोन्ही समस्यांवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ‘स्पीड रडार गन्स’ व अल्कोमीटर खरेदी केले आहेत. चार ‘स्पीड रडार गन्स’ची किंमत 30 लाख रुपये तर  100 अल्कोमीटर्सची किंमत 29.9 लाख रुपये इतकी असल्याचे त्यांनी सांगितले.

 या लेझर स्पीड रडार गन्स एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेल्या जावू शकतात. त्याचबरोबर अतिवेगाने  जात असलेल्या वाहनांची छायाचित्रे टिपण्याबरोबरच त्यांचे व्हिडीओ शूटींग देखील  करता येते. अतिवेगवान  वाहन चालवणे तसेच मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे वाहन चालक आढळून आल्यास  त्याला दंड ठोठावला जाईल. त्याचबरोबर त्याचा चालक परवाना तीन महिन्यांपर्यंत  निलंबित करण्याची शिफारस वाहतूक खात्याला केली जाणार आहे, असेही डॉ. चंदर यांनी सांगितले.   यावेळी वाहतूक  पोलिस अधीक्षक दिनराज गोवेकर उपस्थित होते.