Fri, Mar 22, 2019 01:52
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › गोव्यात पदव्युत्तर प्रवेशासाठी आता विशेष चाचणी

गोव्यात पदव्युत्तर प्रवेशासाठी आता विशेष चाचणी

Published On: Feb 28 2018 12:04AM | Last Updated: Feb 28 2018 12:00AMपणजी : प्रतिनिधी

गोवा विद्यापीठात येत्या 2018-19 शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रवेश चाचणी द्यावी लागणार आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार,  फक्त पारंपरिक परीक्षेतील  गुणांच्या आधारे  प्रवेश मिळणार नसून चाचणीतील गुणांवर आधारीत गुणवत्ता यादीनुसार  पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाणार आहे, असे विद्यापीठाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

गोवा विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. पदवी परीक्षेतील गुणांवर आतापर्यंत प्रवेश दिले जात होते. परंतु ही पद्धत येत्या वर्षापासून बदलण्यात येणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखी चाचणी घेतली जाणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 12 वी नंतर ‘सीईटी’, ‘एनईईटी’ सारख्या चाचण्या जशा घेतल्या जातात त्याच धर्तीवर परंतु वेगळ्या स्वरूपात या  असतील. या परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर नवीन गुणवत्ता यादी बनविली जाणार आहे आणि त्या आधारावर प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या एका अधिकार्‍याकडून देण्यात आली. अशा प्रकारची प्रवेश प्रक्रिया देशातील अनेक अग्रगण्य विद्यापीठांत यापूर्वीच लागू करण्यात आली आहे. ही पद्धती प्रभावीही ठरत असल्याचे विद्यापीठाच्या शैक्षणिक मंडळाच्या काही पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे, असे सांगण्यात आले.

चाचणीचे नेमके स्वरूप काय असेल, याबाबत अद्याप  काही ठरलेले नसले तरी पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या अभ्यासक्रमातील विषयांवर आधारीत ही चाचणी घेण्याचा निर्णय तूर्त झाला आहे. एकूण गुण आणि इतर स्वरूप नंतर ठरविले जाणार आहे. 

नवीन प्रवेश पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रस्ताव विद्यापीठासमोर मागील अनेक वर्षांपासून होता, परंतु यावेळी शैक्षणिक मंडळाने हा विषय गांभीर्याने घेतला. त्यासाठी चर्चा करण्यासाठी अनेक बैठकाही झाल्याची माहिती विशेष सूत्रांकडून देण्यात आली.