Thu, May 23, 2019 04:18होमपेज › Goa › गोव्यात सोनिया गांधींच्या आगमनामुळे राजकीय तर्कवितर्काला उधाण

गोव्यात सोनिया गांधींच्या आगमनामुळे राजकीय तर्कवितर्काला उधाण

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 03 2018 8:14AMमडगाव  ः प्रतिनिधी 

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आजारी असल्याची संधी साधून काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी मोर्चेबांधणी करत असल्याचे वृत्त  पसरलेले असताना दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलात काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी   यांचे आगमन झाल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत कन्या प्रियंका गांधी वडेरा आणि जावई रॉबर्ट वडेरा हेही आले आहेत. गेले चार दिवस दक्षिण गोव्यात त्यांचा मुक्‍काम असून गोव्यातील राजकीय परिस्थितीवर त्या लक्ष ठेवून आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

शुक्रवारी सोनिया गांधी व प्रियंका गांधी सासष्टीच्या किनारपट्टी भागात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरल्या होत्या. सध्या गोव्यात राजकीय घडामोडींना ऊत आलेला आहे. सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रयत्नशील असून सोनिया गांधी गोव्यात उतरल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांमध्ये गुप्त बैठका होऊ लागल्या आहेत. श्रीमती सोनिया गांधी या सर्व प्रकारावर लक्ष ठेवून आहेत. काँग्रेस पक्षाच्या एक प्रवक्त्याने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेचा पुरेपूर फायदा घेण्याचे काँग्रेस पक्षाने ठरवले असून सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी पुढाकार घेतलेला आहे. सोनिया गांधी यांच्याशी नावेली मतदारसंघाचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांचे निकटचे संबंध आहेत. लुईझिन यांच्या माध्यमातून गांधी यांची भेट घेतली जाऊ शकते. पहिल्यांदाच जुने मतभेद विसरून  लुईझिन फालेरो आणि दिगंबर कामत हे दोघे आमदार एकत्र आले असून लुईझिन फालेरो यांच्या माध्यमातून सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे डावपेच सोनिया गांधी यांना कळवले जात असल्याचेही काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

दिगंबर कामत यांचे सत्ताधारी सरकारला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार आणि घटक पक्षाच्या आमदारांशी चांगले संबंध आहेत. त्यासाठी ही महत्वपूर्ण जबाबदारी गांधी यांच्या सूचनेनुसार दिगंबर कामत यांच्यावर सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, भाजपात प्रवेश केलेले काँग्रेसचे दोन आमदार पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील असून या विषयी गांधी यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांकडून समजले. सर्व घडामोडींवर दक्षिण गोव्यातून सोनिया गांधी लक्ष ठेवून आहेत.

याविषयी नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांना विचारले असता, सोनिया गांधी या खासगी दौर्‍यावर गोव्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्या यापूर्वी अनेकदा गोव्यात खासगी दौर्‍यावर आलेल्या आहेत. अशा दौर्‍यावेळी त्या कधीच कोणाला भेटत नाहीत, असेही फालेरो म्हणाले.राज्यात सध्या राजकीय खलबते सुरू आहेत पण आपण चार दिवसांपूर्वी गोव्यात आलो असून आपणाला त्याबद्दल कोणतीच माहिती नाही,  शिवाय आपली आणि सोनिया गांधी यांची भेट झालीच नाही, असेही ते म्हणाले. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, सोनिया गांधी या आपल्या परिवारासोबत गोव्यात आल्या असून हा दौरा राजकीय नाही.

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे सोनिया गांधी या आणखी काही दिवस गोव्यात मुक्कामाला असतील. त्यासाठी ईशान्येकडील राज्यांचा ताबा दिलेले लुईझिन फालेरो तात्काळ गोव्यात परतले आहेत. त्या लवकरच बैठक घेऊन सवार्ंशी चर्चा करतील, असेही  समजते.