Thu, Jun 27, 2019 13:43होमपेज › Goa › कोकण रेल्वेने सौरऊर्जा प्रकल्प राबवावा

कोकण रेल्वेने सौरऊर्जा प्रकल्प राबवावा

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 11:53PMमडगाव : प्रतिनिधी

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कोकण रेल्वेने प्रस्ताव सादर करावा त्यासाठी लागणारा खर्च खासदार निधीतून केला जाईल, असे प्रतिपादन दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी मडगावच्या कोकण रेल्वेस्थानकावर खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनप्रसंगी केले.

राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, नगराध्यक्षा बबिता आंगले, नगरसेवक रुपेश महात्मे व कोंकण रेल्वेचे इतर अधिकारी उपास्थित होते.

सावईकर म्हणाले, 2014 साली खासदार म्हणून निवडून आल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली होती. कोकण रेल्वेचा राज्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे.लोकांना प्रवासाची सुविधा देण्याबरोबर रेल्वेने इतर क्षेत्रांतही योगदान दिले आहे. रेल्वेमंत्री असताना सुरेश प्रभू यांनी मडगाव रेल्वे स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. रेल्वे स्थानकावर दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले पदपथ याचाच एक भाग आहे. अतिरिक्त पदपथसुद्धा खासदार निधीतून बांधून दिला जाईल, असे ते म्हणाले.

मडगाव रेल्वेस्थानकाच्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, असे आश्‍वासन  सावईकर यांनी दिले. लोकांनी वालंकणी येथे जाणारी रेल्वे आठवड्याला दोनवेळा सुरू करावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी रेल्वेचे दुपदरीकरण  करण्याची आवश्यकता असून लोकांनी त्या कामात सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.

सावईकर म्हणाले,की केवळ कोकण रेल्वेलाच नव्हे तर पश्चिम मध्य रेल्वेच्या प्रकल्पांना खासदार निधीतून सहकार्य केले जाईल. मडगावात खासदार निधीतून सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी पोलिस आणि पालिकेने प्रस्ताव सादर केला होता,आता त्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची देखरेख करण्याची जबाबदारी पालिका किंवा पोलिसांची आहे. 

खाणबंदी बाबत बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला नजरेसमोर ठेवून  निर्णय घेतला जाईल, असे  सांगून सावईकर म्हणाले, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी आपण याबाबत चर्चा केली असून लवकरच तोडगा काढला जाईल.विनय तेंडुलकर आणि बबिता आंगले यांचे यावेळी भाषण झाले.