Sat, Jul 20, 2019 12:56होमपेज › Goa › सोळा खाण आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या हालचाली

सोळा खाण आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या हालचाली

Published On: Mar 25 2018 1:47AM | Last Updated: Mar 25 2018 12:46AMपणजी : प्रतिनिधी

पणजीत  19 मार्च रोजी  झालेल्या  खाण अवलंबितांच्या मोर्चातील 16 आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी राज्यातील विविध पोलिस स्थानकांना बिनतारी संदेश पाठवले असल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली. दरम्यान, 15 आंदोलनकांनी अटकपूर्व जामिनासाठी पणजी न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी तीन जणांनी जामीन अर्ज केला होता. यात  खाण व्यावसायिक हरीश मेलवानी, ट्रकमालक प्रमोद सावंत व विनोद पेडणेकर यांचा समावेश होता. त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या  आंदोलकांची संख्या आता 18 झाली आहे.

पणजी पोलिसांनी उत्तर गोवा पर्यटक टॅक्सी मालक संघटनेचे सरचिटणीस विनायक नानोस्कर व  प्रवक्‍ते बाप्पा कोरगावकर यांना ताब्यात घेण्याची विनंती कळंगुट पोलिसांना केली आहे. या दोघांनी   खाण अवलंबितांच्या मोर्चावेळी आंदोलकांना चिथावल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. सध्या  या दोघांचाही थांगपत्ता नसल्याचे पोलिसांना सांगितले.  पणजीतील खाण अवलंबितांचे आंदोलन हिंसक झाले होते. आंदोलकांनी यावेळी रस्ता अडवत वाहतूक रोखली. तसेच दगडफेक करून वाहनांचे व सरकारी मालमत्तेचे नुकसान केले होते. परिणामी पोलिसांना त्यांच्यावर लाठीमार करावा लागला होता. यापैकी 16 आंदोलकांना पणजी पोलिसांनी समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास  सांगितले होते. मात्र, ते फिरकलेच नाही. त्यामुळे आता पणजी पोलिसांनी जुने गोवे, फातोर्डा, फोंडा, कुडचडे, साळगाव, वेर्णा व वाळपई पोलिस स्थानकांना बिनतारी संदेश पाठवून त्यांना ताब्यात घेण्याची विनंती केली आहे.  

आंदोलनादिवशीच्या व्हिडीओ फुटेजच्या आधारे  डिचोली पोलिसांनी 16 तर वाळपई पोलिसांनी 6 संशयित खाण आंदोलकांची ओळख पटवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पणजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतलेल्या 15 आंदोलकांमध्ये नारायण कुडणेकर (वय 43, कुडणे), दामोदार बोरकर (43, फोंडा), प्रशांत धारगळकर (41, लामगाव डिचोली), नूरमहम्मद  शेख (43, किर्लपाल सार्वर्डे), रवी नाईक (47,पर्वरी), नितीन शिवडेकर (29, सत्तरी), नोबेल डायस, आशिष नाईक, दिलीप देविदास, प्रदीप नाईक, राजेश नाईक, राजू देविदास, सूर्या नाईक, गुरुदास  नाईक व सबेस्तियो सिमोईस यांचा यात समावेश आहे. 

Tags : goa, Sixteen mining activists Arrest movement