Wed, Apr 24, 2019 12:15होमपेज › Goa › कॅसिनोंना स्थलांतरासाठी सहा महिने मुदतवाढ

कॅसिनोंना स्थलांतरासाठी सहा महिने मुदतवाढ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

मांडवी नदीतील सहा तरंगत्या कॅसिनोंच्या स्थलांतरासाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय त्रिमंत्री समितीने घेतला आहे. मंत्रिमंडळाची  बैठक न घेता सर्व मंत्र्यांमध्ये प्रस्ताव फिरवून (बाय सर्कुलेशन) त्यांना मंजुरी दिली आहे. कॅसिनो धोरण निश्‍चित झाले नसल्याने स्थलांतरासंदर्भात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याची तसेच  विविध शुल्कात वाढ केल्याची  माहिती सूत्रांनी दिली. 

कॅसिनो जहाजे  मांडवीत ठेवण्याबाबत  मागील चार वर्षांत पाच ते सहावेळा सरकारने मुदतवाढ दिली.  जून-2017 मध्ये तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.   सप्टेंबरमध्ये आणखी सहा महिन्यांची मुदत वाढविली. येत्या  31 मार्चला मांडवी नदीतील कॅसिनोंच्या परवान्यांची तथा मांडवी नदीत   कॅसिनो जहाजे नांगरून ठेवण्याची मुदत संपते.   तथापि, दरवेळी मुदत संपत आली की, सरकार  मुदत वाढवून देते. यावेळीही तसाच निर्णय झाला आहे.

येत्या दि. 1 एप्रिलपासून दि. 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मांडवी नदीत कॅसिनो जहाजे राहू शकतील, असे मंत्रिमंडळाने बुधवारी मंजूर केलेल्या नव्या  प्रस्तावात म्हटले आहे. भविष्यात हे कॅसिनो  मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मनोरंजन विभागात  नेण्याचा सरकारचा विचार आहे,  पण बुधवारी कॅसिनोंसंबंधी प्रस्तावात त्याविषयी कोणतेच भाष्य करण्यात आलेले नाही.

वार्षिक शुल्कात वाढ 

राज्यातील जहाजातील सहा व जमिनीवरील नऊ हॉटेलमधील कॅसिनोंच्या परवान्यासाठी सरकारने  चार ते पाच पटीने शुल्क वाढविले आहे.  दोनशे प्रवासी क्षमतेच्या तरंगत्या कॅसिनो जहाजांसाठी वार्षिक शुल्क 10 कोटी रुपये आकारले जात होते. ते आता पंचवीस कोटी रुपये केले आहे. 201 ते 400 प्रवासी क्षमता असलेल्या जहाजांना अकरा कोटी रुपये शुल्क आकारले जात होते. ते आता 30 कोटी  रुपये इतके केले आहे. चारशेहून जास्त प्रवासी क्षमतेच्या कॅसिनो जहाजांना 12 कोटी रुपयांवरून 40 कोटी रुपये शुल्क निश्‍चित केले आहे. परवाना दुसर्‍याला हस्तांतर करण्याचे शुल्क तरंगत्या कॅसिनोंसाठी 20 कोटी रुपये होते, ते 50 कोटी केले आहे. जमिनीवरील हॉटेलांमधील कॅसिनोंसाठी हे शुल्क दहा कोटी होते, ते 30 कोटी केले आहे.

अर्ज शुल्क, सुरक्षा अनामतीत वाढ

याआधी कॅसिनोंना वीस लाख रुपये अर्ज शुल्क होते, ते आता पन्नास लाख रुपये केले आहे. कॅसिनोंना परवाना देताना सुरक्षा ठेव म्हणून अगोदर 2 लाख रुपये घेतले जात होते व परवान्याचे नूतनीकरण करताना दहा लाखांची  अनामत घेतली जात होती. ती  आता ऑफशोर कॅसिनोसाठी अनुक्रमे पन्नास व ऑनशोर कॅसिनोंसाठी पंचवीस लाख रुपये केली आहे. परवान्याचे नूतनीकरण करताना स्वतंत्रपणे शुल्क म्हणून 30 लाख रुपये आकारले जात होते. ते आता एक कोटी रुपये केले आहे. या भरमसाठ शुल्क वाढीमुळे सरकारला सुमारे 150 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या शुल्कवाढीचा कॅसिनो मालकांनी धसका घेतला असून फायदा कमी होण्याच्या भीतीने हा धंदा बंद करण्याबाबत त्यांच्यात विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

Tags : goa news, Six months, extension, casino migration, 


  •