Wed, Jun 26, 2019 17:55होमपेज › Goa › सासष्टीतील नर्सरी चालकांना ‘कारणे दाखवा’नोटिसा

सासष्टीतील नर्सरी चालकांना ‘कारणे दाखवा’नोटिसा

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 06 2018 1:13AMमडगाव : प्रतिनिधी 

शहरात व्यापार परवान्याशिवाय  ‘नर्सरी’ (रोपवाटिका) चालवणार्‍या व्यावसायिकांना  कृषी खात्याने  ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती कृषी खात्याचे सासष्टी विभागातील अधिकारी अनिल नोरोन्हा यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली. शहरात गेल्या 10 ते 15 वर्षांपासून बेधडकपणे  विनापरवाना सुरू असणारा रोपवाटिका व्यवसाय  पालिका व कृषी खाते खपवून घेत असल्याने यावर कारवाईची मागणी  होत होती. त्यानुसार व्यापार परवान्याशिवाय रोपवाटिकेचा व्यवसाय केल्याप्रकरणी पालिकेने मागील महिन्यात काही दुकानांना टाळे ठोकले होते.  गेल्या महिन्यात सासष्टी भागातून केवळ पाच नर्सरी मालकांनी व्यापार परवान्यासाठी नोंदणी केल्याने इतर सर्व रोपवाटिका चालकांना कारणे  दाखवा, नोटिसा बजावण्यात आल्या आहेत,असे नोरोन्हा म्हणाले.

द गोवा फ्रुट अँड प्लांट नर्सरीज कायदा 1995 च्या नुसार राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी व्यापार परवाना  घेण्याच्या सूचना  रोपवाटिका चालकांना दिल्या होत्या, मात्र याला अत्यल्प प्रतिसाद लाभला. संपूर्ण सासष्टी तालुक्यात एकाही रोपवाटिका चालकाने याची दखल घेतली नव्हती. प्राप्त माहितीनुसार राज्यात 1998 साली एकूण 140  रोपवाटिकांनी व्यापार परवाना घेतला होता.  पुन्हा 2003 साली परवाना नूतनीकरणाची  वेळ आली तेव्हा  केवळ 25  व्यावसायिकांनी नूतनीकरण केले.  राज्यात   रोपवाटिकांची  संख्या वाढली असून सुमारे 150 च्या आसपास झाली आहे, असेही नोरोन्हा म्हणाले.  

या रोपवाटिकांत 50 रुपयांपासून  काही खास फुलझाडांच्या छोट्याशा रोपट्याची किंमत 500 ते हजार रुपयांपर्यंतही आहे. शहरात अनेक ठिकाणी मुख्य मार्गावर फ्रुट अँड प्लँट नर्सरी आहे. प्रत्येक  रोपवाटिका शहराच्या महामार्गाकडील सुमारे 150 ते 200 चौरस मीटर जागा व्यापत असून हा व्यापार प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात फूलझाडे उपलब्ध आहेत. शहरात मुख्य रस्त्यावर गेल्या 10 ते 15 वर्षांपासून हा बेकायदेशीर  व्यवसाय सुरू असून ग्राहकांची फसवणूक होत आहे, असे गोवा कॅन या संस्थेच्या सूत्रांनी सांगितले.  याबाबतचे वृत्त   ‘पुढारी’ने  ‘सिटी फोकस’  सदरात प्रसिध्द केल्याने मडगावसह कुंकळी व कासावलीच्या काही रोपवाटिका मालकांनी व्यापार परवान्यासाठी अर्ज दाखल केले.   विना परवाना सुरू असलेल्या या व्यवसायावर कृषी खाते वा प्रशासन  काहीच कारवाई करत नसल्याने ‘गोवा कॅन’ या  संस्थेने   कृषी अधिकार्‍यांना  16 फेब्रुवारी 2018 रोजी   पत्र पाठवून कारवाईची मागणी केली  होती. 

Tags : Goa, Show, Causes, Nursery