पणजी : प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.2) रात्री उशिरा पाठवलेल्या आदेशाद्वारे पक्षाचे गोवा राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांची पक्षाच्या राज्यप्रमुख पदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना राज्यप्रमुखाची दोन पदे निर्माण करून जितेश कामत यांची राज्यप्रमुखपदी नेमणूक करण्यात आल्याने गोवा शिवसेनेत बंडाळीचे वातावरण तयार झाले असून या बंडाचा भाग म्हणून शिवप्रसाद जोशी यांच्यासह पक्षाच्या सर्व बाराही तालुक्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांसह आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मात्र, जोशी यांनी राजीनामा देण्यापूर्वीच पक्षप्रमुख ठाकरे यांनी त्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात येत असल्याचे पत्र जारी केले. गोवा शिवसेनेच्या राज्यप्रमुखपदी शिवप्रसाद जोशी यांची 12 नोव्हेंबर 2016 रोजी नेमणूक करण्यात आली होती. शिवसेनेचे गोवा प्रभारी तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ही घोषणा केली होती. जोशी यांच्या कार्यकाळात शिवसेना पक्षाच्या गोव्यातील वाढीसाठी सदस्य नोंदणी मोहीम तसेच अन्य विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले होते
मात्र, 25 फेब्रुवारी रोजी जोशी यांच्यासह जितेश कामत यांचीही राज्यप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली होती. राज्यप्रमुखाची दोन पदे तयार करण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले होते. परंतु कामत यांच्या नियुक्तीने जोशी समर्थक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती.