होमपेज › Goa › गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : शिवसेना

गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : शिवसेना

Published On: Mar 13 2018 12:26PM | Last Updated: Mar 13 2018 12:32PMपणजी : पुढारी ऑनलाईन

लोकसभेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने गोव्यातून राजकीय खेळीला सुरुवात केली आहे. भाजपची साथ सोडून गोव्यातील दोन जागेवर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सत्ताधारी भाजप सरकारने गोव्याच्या जनतेचा भ्रमनिरास केल्याचा आरोप केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या अनुपस्थिती गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेने उचलून धरली आहे.   

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गोवा राज्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यात भाजप नेते सपशेल अयपयशी ठरले आहेत अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. जनतेचा भ्रमनिरास करणाऱ्या भाजपचा गोव्यातील विकासाचा अजेंडा फेल झाला आहे. पर्रिकरांच्या अनुपस्थितीत अन्य कोणताही भाजप नेता सक्षम कारभार पाहण्यासाठी सक्षम दिसत नाही. त्यामुळे राज्याचा कारभार राष्ट्रपती किंवा केंद्राने पाहावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. मनोहर पर्रिकर उपचारासाठी अमेरिकेला गेले आहेत. पर्रिकरांच्या अनुपस्थितीत गोव्याचा कारभार पाहण्यासाठी एका त्रिसदस्यीस समितीची स्थापना करण्यात आली आहे. पर्रिकर यांच्या अनुपस्थितीत ही समिती कामकाज पाहणार आहे.  

आगामी लोकसभा निवडणुकीत गोवा सुरक्षा मोर्चा (जीएसएम) च्या साथीने शिवसेनेने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. विधानसभेतील अपयशाची पुनरावृत्ती टाळून गोव्यात भाजपसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी शिवसेना कंबर कसत असल्याचे दिसते.