Tue, Mar 19, 2019 20:36होमपेज › Goa › शिरोडकर खूनप्रकरण : भाऊ, पुतण्याला अटक

शिरोडकर खूनप्रकरण : भाऊ, पुतण्याला अटक

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 30 2017 12:28AM

बुकमार्क करा
काकोडा : वार्ताहर

कुयणामळ, सांगे येथील शांताराम शाणू शिरोडकर (वय 70) यांच्या खूनप्रकरणी त्यांचा भाऊ रविदास शिरोडकर (73) व पुतण्या जय शिरोडकर (39) या दोघांना सांगे पोलिसांनी गुरुवारी रात्री  उशिरा अटक केली.  शुक्रवारी केपे न्यायालयात पोलिसांनी संशयिताला हजर केले असता, जय शिरोडकरला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर रविदास याने तब्येत बिघडल्याची तक्रार केल्याने त्याला सांगे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी शांताराम यांची विवाहित कन्या साची उपसकर हिने सांगे पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीस अनुसरून पोलिसांनी शोधकार्य हाती घेऊन गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दोघांना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगे आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी रविदासचा रक्तदाब वाढला असल्याचे सांगितले. रविदासच्या तब्येतीत सुधारणा होताच त्याला रिमांडवर घेण्यासाठी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

सांगे पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून संशयितांच्या घरातील इतर सदस्यांची जबानी नोंदवून घेण्यात आली आहे. या गुन्ह्यात दोघेजणच की आणखी कोणाचा सहभाग आहे, याची कसून चौकशी करण्यात येत आहे. आगीत होरपळून शांताराम शिरोडकर यांचा मृत्यू झाल्याचे भासविले जात असले तरी भरदिवसा  काजू बागायतीला लागलेली आग ठराविक भागापुरतीच कशी काय राहिली, ती आग पुढे पसरली कशी नाही, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असून त्यादृष्टीने पोलिस शोध घेत आहेत.