Fri, Feb 22, 2019 01:23होमपेज › Goa › शांताराम यांचे अंत्यसंस्कार रखडले  

शांताराम यांचे अंत्यसंस्कार रखडले  

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 11:45PM

बुकमार्क करा
मडगाव : प्रतिनिधी

जमिनीच्या वादातून खून झालेल्या शांताराम शिरोडकर यांच्या मृत्यूला गुरुवारी, 4 जानेवारी रोजी अकरा दिवस पूर्ण होत आहेत. पण जोवर त्यांच्या डीएनए चाचणीचा अहवाल येत नाही तोवर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवता येणार नाही, अशी भूमिका वैद्यकीय अधिकार्‍यांनी घेतल्याने शांताराम यांच्या मृत्यूनंतरचे विधी पूर्ण न करताच त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ शिरोडकर कुटुंबीयांवर आल्याने शोक व्यक्त केला जात आहे. अंत्यविधी व अन्य विधींच्या पूर्ततेसाठी मयत शांताराम यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवावा,अशी मागणी महाबळेश्‍वर शिरोडकर यांनी पोलिस व वैद्यकीय प्रशासनाकडे केली आहे.

शांताराम यांचा खून कोणी आणि कशाप्रकारे केला याचे वृत्त ‘पुढारी’त प्रसिद्ध झाल्याने शिरोडकर कुटुंबीयांनी अखेर सत्य बाहेर आले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘पुढारी’चे आभार मानून स्थानिक नगरसेवक प्रकाश गावकर यांनी या वृत्ताची शिरोडकर यांचे कुटुंबीय गेल्या दहा दिवसांपासून वाट पाहत होते, अशी प्रतिक्रिया दिली. शांताराम यांचे पुतणे महाबळेश्‍वर शिरोडकर यांनी   ‘पुढारी’शी बोलताना  सांगितले, की आज आपल्या कुटुंबावरील मोठे दडपण कमी झाले. खुनी कोण याचा अंदाज सर्वांना होता, मात्र तो केव्हा गुन्हा कबूल करेल आणि त्यासंबंधीचे वृत्त  प्रसिद्ध होईल, याकडे आमच्या नजरा लागल्या होत्या.

शांताराम यांच्या मृत्यूला आज अकरा दिवस पूर्ण होत आहेत. हिंदू रिवाजाप्रमाणे आज त्यांच्या अकरा दिवसांचा विधी होणार होता. पण अशा स्थितीत डॉक्टरांनी त्यांचा मृतदेह देण्याचे नाकारले. मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेला नाही. त्यामुळे मृत्यूनंतरचे कोणतेच विधी करता येणार नाहीत.  त्यांच्या मृत्यूनंतरचे विधी का होऊ शकले नाहीत,  हे सर्व गावकर्‍यांना माहीत असून सर्वांचे सांत्वन आम्हाला लाभत असल्याचे महाबळेश्‍वर शिरोडकर यांनी सांगितले.

‘खून प्रकरणात आणखी काहींचा हात’

शांताराम शिरोडकर यांच्या खुन्याने कबुली दिल्याचे वृत्त ‘पुढारी’त प्रसिद्ध झाल्यानंतर शिरोडकर कुटुंबीयांनी सांगे पोलिस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांची भेट घेऊन अधिक माहिती जाणून घेतली. जय शिरोडकरनेे आपण एकट्यानेच शांतराम यांचा खून केल्याचे आणि त्यांना जाळल्याचे कबूल केले असले तरी या प्रकरणात अन्यही कुणी सामील  असावेत, असा दावा शांताराम यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांसमोर केला आहे.