Fri, Jul 19, 2019 19:49होमपेज › Goa › शॅक मालकांना सरकारने शंभर टक्के भरपाई द्यावी

शॅक मालकांना सरकारने शंभर टक्के भरपाई द्यावी

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 12:18AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शॅक मालकांना सरकारने शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करून तलाठ्यांनी शॅक्सच्या नुकसानीचा आकडा पंचनाम्यात नमूद केलेला नसल्याने  त्यांना पंचनामा कसा करावा याचे प्रशिक्षण सरकारने  द्यावे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत  सांगितले.

तलाठ्यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करताना नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, याचा आकडा पंचनाम्यात नमूद केलेला नाही. शॅक मालकांना किती नुकसान झाले आहे हे शॅक मालकांना कसे समजणार, असा प्रश्‍नही नाईक  यांनी उपस्थित केला. 

सरकारने शॅकचा विमा करावा, त्याचप्रमाणे शॅकना वेळीच परवाने द्यावे. नैसर्गिक आपत्तीमुळे शॅक मालकांचे मोठे नुकसान होते, असेही ते म्हणाले. कांदोळी किनारपट्टी भागांत गांजा पिकाची लागवड केली जात आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता, असे ते म्हणाले. 

राज्यातील कोणत्या भागात गांजाची लागवड होते, याचा पोलिसांनी  शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. ही सर्व माहिती पोलिसांनी गोवा पोलिस संकेतस्थळावर टाकावी, जेणेकरून पोलिस चौकशीत पारदर्शकता येईल. स्थानिक आमदार आणि अन्य स्थानिक पंचायत सदस्यांनी गांजा किंवा इतर अमली पदार्थांसंबंधी माहिती पोलिसांना देणे आवश्यक असल्याचे शांताराम नाईक यांनी सांगितले.