Mon, Mar 25, 2019 05:06
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › ..तर भारतासह विश्‍वात हिंदू राष्ट्र स्थापना 

..तर भारतासह विश्‍वात हिंदू राष्ट्र स्थापना 

Published On: Jun 05 2018 1:41AM | Last Updated: Jun 05 2018 1:41AMपणजी ः प्रतिनिधी

देशातील हिंदू आज कुपमंडूक झाले आहेत. दुसरीकडे महिलांवर अत्याचार होत आहेत. सध्या चारही दिशांना आग लागली असून, महिलांनी झाशीच्या राणीप्रमाणे कार्यरत होऊन पुढे यायला हवे. प्रत्येकाचे क्षात्रतेज जागृत व्हायला हवे. हिंदूंनी ब्रह्मतेजाद्वारे क्षात्रतेज जागृत केल्यास भारतासह विश्‍वात सर्वत्र हिंदू राष्ट्र स्थापन होईल, असे प्रतिपादन लालेश्‍वर महादेव मंदिर, बिकानेर (राजस्थान) येथील महंत स्वामी संवित्सोमगिरीजी महाराज यांनी केलेे.   

रामनाथी, गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहामध्ये आयोजित सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ‘हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी क्षात्रतेजाच्या उपासनेची आवश्यकता’ या विषयावर ते बोलत होते. 

अधिवेशनाच्या प्रारंभी महंत स्वामी संवित्सोमगिरीजी महाराज, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद‍्गुरू  डॉ.  चारुदत्त पिंगळे, सनातनचे धर्मप्रसारक सद‍्गुरू नंदकुमार जाधव, कु. अनुराधा वाडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी देश-विदेशातील 150 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे 250 हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

या अधिवेशनामध्ये काश्मीरची समस्या, कलम 370 रद्द करणे, पाकिस्तान, बांगला देश आणि श्रीलंका येथील हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे, राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात रोखण्यासाठी उपाय, हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्याची आगामी दिशा अशा विविध विषयांवर विस्तृत चर्चाकरण्यात येणार आहे.

दीपप्रज्वलनानंतर सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी वेदमंत्रांचे पठण केले. त्यानंतर उपस्थित संतांच्या हस्ते हिंदू जनजागृती समिती पुरस्कृत ‘हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करा’ या मराठी आणि हिंदी भाषांतील, तसेच सनातनच्या ‘स्वभावदोष (षड्रिपु) निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया’ या मराठी आणि हिंदी भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन करण्यात 
आले. यावेळी प्रदीप खेमका यांनी हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्थान डॉ. जयंत आठवले यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने दिलेल्या संदेशाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सुमित सागवेकर यांनी केले.

उद्योगपती परिषद, आरोग्य सहाय्यता समितीची स्थापना 

अधिवेशनामध्ये हिंदू जनजागृती समितीअंतर्गत उद्योगपती परिषद आणि आरोग्य सहाय्यता समिती यांची स्थापना करण्यात आली. या संघटनांच्या बोधचिन्हाचे अनावरण वेदमंत्रांच्या घोषामध्ये महंत स्वामी संवित्सोमगिरीजी महाराज यांच्या मंगलहस्ते करण्यात आले. संघटनेच्या उद्देशाची माहिती समितीचे केंद्रीय समन्वयक नागेश गाडे यांनी दिली. हिंदुत्वनिष्ठांना सहाय्य करण्यासाठी उद्योगपती परिषद आणि आपत्काळात समाजाला सहाय्य करणे अन् वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य सहाय्यता समिती या उद्देशाने या दोन्ही संघटना कार्यरत असणार आहेत. 

हिंदूंनाच देशात घटनात्मक संरक्षण  नाही ः डॉ. पिंगळे

भारतात बहुसंख्याकांच्या सनातन धर्माला घटनात्मक संरक्षण नाही. त्यामुळेच आज कोणीही उठतो आणि हिंदूंना अपराधी ठरवण्याचा प्रयत्न करतो, असे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितले. ते म्हणाले,जगातील सर्व देशांमध्ये त्यांच्या संविधानाद्वारे तेथील बहुसंख्याकांचा धर्म, संस्कृती, भाषा आणि हित यांना संरक्षण देण्यात आले आहे. भारत हा एकमात्र देश आहे की, जेथे बहुसंख्य असूनही हिंदूंना घटनेद्वारे कुठलेही संरक्षण देण्यात आलेले नाही. उलट भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे पंथ, संस्कृती, भाषा आणि हित यांना संरक्षण दिले आहे. हे संविधानाच्या समतेच्या तत्त्वाच्या (म्हणजे लॉ ऑफ इक्वॅलिटीच्या) विरोधात आहे.