Tue, Apr 23, 2019 01:35होमपेज › Goa › अपघातांची मालिका; एक ठार, दोघे बुडाले

अपघातांची मालिका; एक ठार, दोघे बुडाले

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 12:17AMपणजी : प्रतिनिधी 

राज्यात दोन दिवसांत अपघातांची मालिकाच सुरू असून चिंबल येथे भरधाव कारच्या अपघातात तरुण ठार झाला तर बागा, सिकेरी समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू झाला. सेल्फीच्या मोहात या दोघांना जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे.चिंबल-जुने गोवे बगलमार्गावर  रविवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या   सुमारास  कारने  रस्त्यावरील रेलिंगला जोरदार धडक दिल्याने झालेल्या  अपघातात गंभीर जखमी झालेल्या बाबासाहेब बुवाजी (वय 23, रा. रायचूर, कर्नाटक) या युवकाचा उपचारावेळी गोमेकॉत मृत्यू झाला. कारचालक कासिम अली (23 रा. रायचूर) हा जखमी झाला, तर  कारमधील रवीचंद्रन गुट्टीदार (20), मेहबुब पाशा (23), मोहम्मद बुरहान (23) हे तिघे आश्‍चर्यकारकरित्या बचावले. 

जुने गोवे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातील रायचूर येथून कार (क्र. केए 36 एम 9810)घेऊन पाच मित्र शनिवारी (दि.16) गोव्यात पर्यटनासाठी आले होते.  रविवारी दुपारी पणजीत जेवण केल्यानंतर त्यांनी कर्नाटकच्या दिशेने कार भरधाव वेगात पळवली. मेरशी -जुने गोवे बगलमार्गावर चिंबल येथे राखीव पोलिस दलाच्या कँपजवळ पोहोचल्यावर वाहनचालक अली याचा कारवरील ताबा सुटला व रस्त्याच्या बाजूला असलेल्या रेलिंगवर कारने  जोरदार धडक दिली.   धडक इतकी जोरदार होती की, रेलिंगचे पाच खांब तुटून कारच्या समोरील काचेतून आरपार गेले. यात मध्यभागी बसलेल्या बुवाजीच्या डोक्याला  जबर मार बसला.

गोव्यात येताना शनिवारी रात्री   जागरण झाल्याने कासिम अलीची झोप पूर्ण झाली नव्हती. मात्र, रविवारी दुपारी जेवण केल्यानंतर गावाकडे परतताना आपणच कार चालवणार, असा हट्ट अलीने धरला. भरधाव कार चालवताना डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचे अपघातातून बचावलेल्या एका युवकाने सांगितले.जखमींना तातडीने गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले, मात्र उपचारावेळी बुवाजीचा मृत्यू झाला. कासिम अली हा जखमी असून त्याची प्रकृती सुधारत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मित्रांचे ऐकले असते तर...

गावाकडे जाताना आपणच कार चालवणार असा हट्ट कासिम अलीने धरला होता. आपण काहीकाळ  विश्रांती घेऊन पुढचा प्रवास करू, असे  सांगूनही त्याने ऐकले नाही. अर्धवट झोप झाल्याने झोपेच्या अंमलात कार चालवू नकोस, अशी विनंती केली मात्र अलीने काहीएक ऐकले नाही, अशी माहिती या अपघातातून बचावलेल्या एका युवकाने दिली.