होमपेज › Goa › ‘सेझा-वेदांता’ची कामगारांना कामावर न येण्याची सूचना

‘सेझा-वेदांता’ची कामगारांना कामावर न येण्याची सूचना

Published On: Mar 22 2018 1:42AM | Last Updated: Mar 22 2018 1:42AMपणजी, मडगाव, डिचोली : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने खाणबंदीच्या  दिलेल्या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर खाण कंपन्यांकडून कामगार कपात सुरू झाली आहे.  राज्यातील ‘सेसा- वेदांत’ कंपनीने आपल्या कामगारांना गुरुवारपासून कामावर न येण्याची सूचना केल्याने कामगारांत खळबळ माजली आहे. 

देशातील व राज्यातील सर्वात मोठी खनिज उत्खनन कंपनी असणार्‍या ‘सेसा- वेदांत समूह’ कंपनीने बुधवारी संध्याकाळी आपल्या सर्व शाखेत पत्रक पाठवले आहे. या पत्रकानुसार, कंपनीच्या  सर्व कामगारांनी गुरुवारपासून पुढील नोटिसीपर्यंत कामावर न येण्यास सांगितले आहे. खाणीवरील साचलेल्या पाण्याचा निचरा करणारा, पंपिंग स्टेशन चालवणारा कर्मचारीवर्ग वगळता अन्य सर्व कामगारांना हे पत्रक तत्काळ लागू केले आहे. याशिवाय अन्य सेवा खाणीवरील कार्यालये व शाखा गुरुवारपासून बंद केली जाणार असल्याचे सांगितले आहे. या पत्रकामुळे अन्य खाण कंपनीच्या कामगारांमध्येही गोंधळ माजला असून आपल्यावरही ही वेळ येण्याची भीती अनेकांनी बोलून दाखवली आहे. 

खाणीवर कामाला न येण्याच्या सूचना वेदांताने खाणीवर काम करणार्‍या नियमित आणि अनियमित कर्मचारी व कामगारांना दिल्या आहेत. वेदांता कंपनीचा हा निर्णय अपेक्षित होता. मात्र, या निर्णयामुळे हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड  कोसळणार असल्याचे काही कर्मचार्‍यांनी ‘पुढरी’शी बोलताना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार खाण खात्याने काढलेल्या आदेशाला अनुसरून सेझा गोवा वेदांता कंपनीने आपल्या कामगार आणि कर्मचार्‍यांसाठी खास आदेश काढला असून खाण खात्याकडून पुढील आदेश येईपर्यंत कामावर न येण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेदांताच्या आदेशाप्रमाणे कँटीन आणि वाहतूक आदी सुविधा बंद होणार आहेत. 

पणजी येथील कंपनीच्या मुख्य कार्यालायत कामगार नेत्यांची बैठक झाली. कंपनीला आता कसलेच अधिकार  नसल्याने व काम चालू नसल्याने हा निर्णय घेणे भाग पडल्याचे सांगण्यात आले. पुढील कृतीपर्यंत थांबा, असे आदेश दिले आहेत. 

सेझा गोवा वेदांता कंपनीच्या कोडली खाणीचे व्यवस्थापक जोझेफ कुएलो म्हणाले, की खाणीवरील सर्व व्यवहार बंद असल्याने कर्मचार्‍यांना खाणीवर कोणतेही काम नाही. काम नसताना खाणीवर येण्यापेक्षा त्यांनी घरी बसावे, अशा सूचना त्यांना केल्या असून  या महिन्याचा पगार त्यांना दिला जाणार आहे.