Tue, Mar 26, 2019 01:34होमपेज › Goa › खनिज चोरी रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था : आचार्य

खनिज चोरी रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था : आचार्य

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 16 2018 12:35AMपणजी : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व खनिज उत्खनन, खनिज वाहतूक गुरूवारी संध्याकाळी 7 वाजता बंद करण्यात आले आहे. खनिज चोरी रोखण्यासाठी राज्यातील बंद झालेल्या खाणींवरील सुरक्षा व्यवस्था 31 मार्च-2018 पर्यंत कायम ठेवण्याची सूचना खाण मालकांना करण्यात आली असून पोलिस अधिकार्‍यांनाही खनिज मालाच्या सुरक्षेसाठी कर्मचारी नियुक्त करण्याविषयी पत्र पाठवल्याची माहिती खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार,  दि. 15 मार्चच्या संध्याकाळपासून राज्यात पूर्णतः खाण बंदी लागू झाली आहे.  खाण खात्याने राज्यातील सर्व खाण व्यवसायावर नियंत्रण आणण्यास सुरवात केली आहे. बंद करण्यात आलेल्या खाणींवरील  खनिजाची चोरी होण्याच्या शक्यतेने प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे. यासाठी खाण खात्याने गुरूवारी  उत्तर व दक्षिण जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे, 16 मार्च 2018 पासून   खाण बंदीनंतर खाणींवरील लोह खनिज माल उघड्यावर पडणार  असल्याने तो चोरीला जाण्याची शक्यता  गृहित धरून सर्व खाणींवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात असेल, याची काळजी घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. 

खाण संचालक प्रसन्ना आचार्य यांनी सर्व खाण मालकांना पत्र पाठवून, आपापल्या खाणींवरील सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्याची त्यांना विनंती केली आहे. सदर सुरक्षा व्यवस्था  येत्या 31 मार्चपर्यंत अथवा राज्य सरकारकडून नवी व्यवस्था होईपर्यंत तैनात करण्याचीही विनंती केली आहे. खाण खाते सर्व खाणींवर नजर ठेवणार असले तरी खाणीवरील अधिकार्‍यांनीही नियमित पाहणी आणि खाणींवर हजेरी लावून लिजवरील अथवा खनिज ‘पिट’मधील   खनिज माल चोरीला जाणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना केली आहे.