Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Goa › राज्यातील शाळा आज गजबजणार  

राज्यातील शाळा आज गजबजणार  

Published On: Jun 04 2018 1:37AM | Last Updated: Jun 04 2018 1:31AMपणजी : प्रतिनिधी 

दीर्घकाळाच्या उन्हाळी सुट्टीनंतर  सोमवारी (दि.4) राज्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत. उन्हाळी सुट्टीचा पुरेपूर आनंद लुटल्यानंतर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांची पावले शाळा-विद्यालयांच्या दिशेने वळतील. 

सुट्टी संपून शाळा सुरू होत असल्याने काहीसे  नाराज तर  शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थी तितकेच उत्सुकही आहेत. शाळेचा पहिलाच दिवस असलेला नवा विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांसाठी आजचा दिवस खास असेल. नवीन वर्ग, रोल नंबर, अभ्यासक्रम या गोष्टींचे खास कुतूहल मुलांना असेल.लहान मुलांना शाळेत कसे सोडून यावे, हा मोठा प्रश्‍न पालकांना सतावत असेल.  

गेल्या आठवड्याभरापासूनच  पालकांची  मुलांना शाळेसाठी सज्ज करण्यासाठीची लगबग सुरू होती.  शाळेसाठी लागणार्‍या छत्री, रेनकोट, वह्या, कंपास, दप्तर अशा सर्व वस्तुंची खरेदी झाली असून शाळेत जाण्यासाठी मुले सज्ज झाली आहेत. 

शाळेचा पहिला दिवस असल्याने आज काही शाळा लवकर सोडण्यात येतील.  विद्यार्थी रंगीबेरंगी छत्र्या आणि रेनकोट घेऊन शाळांकडे जाण्याच्या तयारीत आहेत. नवीन गणवेश, पाठ्यपुस्तके, पाट्या घेऊन विद्यार्थी  शाळेत हजेरी लावणार आहेत. 

बांबोळीतील कुजिरा शिक्षण संकुलाकडे जाणार्‍या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी पालकांच्या चिंतेत भर पाडते, त्यामुळे मुलांना शाळेतून आणण्यासाठी व सोडण्यासाठी जाताना मनात धाकधूक असते, असे अभिजीत गोवेकर यांनी सांगितले.