Tue, Mar 19, 2019 05:53होमपेज › Goa › ड्रग्ज विक्रेत्यांकडून शाळा, महाविद्यालये लक्ष्य!

ड्रग्ज विक्रेत्यांकडून शाळा, महाविद्यालये लक्ष्य!

Published On: Apr 27 2018 12:52AM | Last Updated: Apr 27 2018 12:43AMमडगाव ः प्रतिनिधी 

अंमली पदार्थांचा व्यवसाय करणार्‍या ड्रग्ज पेडलरनी उच्च माध्यमिक विद्यालये आणि दक्षिण गोव्यातील महाविद्यालयांना आपले लक्ष्य बनविण्यास सुरू केले आहे. 5  ग्रॅम वजनाचा गांजा अवघ्या 500 रूपयांना उपलब्ध होऊ लागल्याने विद्यार्थीवर्गातूनही गांजाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. दक्षिण गोव्यातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडून प्राध्यापकाने गांजाचा व्हॅक्युम जप्त केल्याच्या धक्कादायक घटनेने गांजाच्या फोफावलेल्या व्यवसायाचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मोले येथील चेकनाक्यावरून दर आठवड्याला लाखो रुपयांचा माल उतरवला जात असल्याचा प्रकार ‘पुढारी’ने उघडकीला आणला होता.स्थानिक प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हाच अमली पदार्थ आता महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयांत पोहोचलेला आहे. नुकतेच दक्षिण गोव्यातील एका महाविद्यालयात विद्यार्थ्याकडे सुमारे 5 ग्रॅम गांजा सापडला. प्राध्यापकांना संशय आल्यानंतर त्यांनी सदर विद्यार्थ्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ रॉ मँगो पद्धतीचा गांजा आढळून आला. शैक्षणिक संस्थेचे नाव बदनाम होण्याच्या भीतीने महाविद्यालयाकडून पोलिसांत तक्रार करण्यात आलेली नाही. दरम्यान, त्या विद्यार्थ्याच्या पालकांना बोलावून त्यांना याविषयी माहिती देण्यात आलेली आहे, अशी माहिती संबंधित महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी दिली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 500 रुपयांना  एक पाकीट गांजा मिळत आहे, तर चरससाठी 800 ते एक हजार रुपये आकारले जातात.चरसपेक्षा गांजा स्वस्त असल्याने विद्यार्थ्यांकडून गांजाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. गांजा ओढण्यासाठी लागणारा पेपर पूर्वीपेक्षा बाजारात सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांची चांदी झाली आहे.

कुळे पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक निलेश धायगोडकर यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, मोले चेकनाक्यावर पोलिस गस्त वाढवण्यात आली असून कर्नाटकातून अंमली पदार्थ गोव्यात येणार नाही, याची दक्षताघेतली जात आहे.

Tags : goa, drug, dealers, school,