Sat, Jul 20, 2019 10:39होमपेज › Goa › शालेय कामकाजात १४ दिवसांची घट

शालेय कामकाजात १४ दिवसांची घट

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 06 2018 12:02AMपणजी : प्रतिनिधी

येत्या जून महिन्यापासून सुरू होणार्‍या 2018-19 सालच्या शैक्षणिक वर्षात राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये परीक्षांचे दिवस धरून एकूण कामकाजाचे दिवस 234  वरून 220, म्हणजे 14 दिवस कमी करण्यात आले आहेत. मात्र, सर्व शालेय वर्ग दरदिवसा किमान साडेपाच तास चालवणे आणि वर्षभरात किमान 200 शिकवणीचे दिवस या अटी कायम ठेवण्यात आल्याची माहिती राज्य शिक्षण संचालनालयाने काढलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे. 

राज्यात 2012 साली भाजपची सत्ता आल्यानंतर एक वर्षानंतर, म्हणजे 2013-14 या शैक्षणिक वर्षापासून शिक्षण खात्याने शाळांचा प्रत्येक दिवसाचा कालावधी 30 मिनिटांनी वाढवला होता. यामुळे आधी 5 तास असलेली शाळा मध्यंतरचा विश्रांतीचा काळ सोडून साडेपाच तास करण्यात आली होती. आता 4 जून 2018 ते 3 नोव्हेंबर 2018 असे पहिले सत्र चालणार आहे. 26 नोव्हेंबर 2018 पासून सुरू होऊन 30 एप्रिल 2019 पर्यंत दुसरे सत्र सुरू राहणार आहे.

शाळेची मध्यवर्ती परीक्षा 3 नोव्हेंबर 2018 पासून तर दुसर्‍या सत्राची परीक्षा 31 मार्च 2019 पासून घेतली जाणार आहे. परीक्षेचा निकाल 29 एप्रिल 2019 नंतरच जाहीर करावा, असे परिपत्रकात म्हटले आहे.