Wed, Apr 24, 2019 00:18होमपेज › Goa › दूधसागरवर सुविधांसाठी सावईकरांचा पुढाकार

दूधसागरवर सुविधांसाठी सावईकरांचा पुढाकार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

फोंडा : प्रतिनिधी 

कुळे येथील प्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी 12 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी बेली पूल, कँटिन व शुद्ध पाण्याची व्यवस्था करून देण्यासाठी दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी नुकतीच केंद्रीय पर्यावरणमंत्री हर्षवर्धन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.      

महावीर अभयारण्य क्षेत्रात येणार्‍या दूधसागर धबधब्यावर दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक येतात. पर्यटकांसाठी याठिकाणी आवश्यक साधनसुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची गैरसोय होते. तसेच कुळे पंचायत क्षेत्रातील बहुतेक लोक याठिकाणी छोटे-मोठे व्यवसाय करतात. दूधसागर धबधब्यावर येणार्‍या पर्यटकांवर त्यांचा व्यवसाय अवलंबून आहे. तसेच पर्यटकांची धबधब्याच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी सुमारे 450 हुन अधिक जीप याठिकाणी तैनात असतात.  

पर्यटकांची ने-आण करताना रस्त्यात  दोन ते तीन ठिकाणी नदी पात्र ओलांडावे लागते. त्यामुळे आवश्यक ठिकाणी बेली पूल उभारण्याची गरज असल्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. कुळे ते दूधसागर मधील अंतर 12 किलोमीटर असून रस्ताही अरुंद आहे. पर्यटकांना सुरक्षितपणे दूधसागर धबधब्यापर्यंत पोहोचविताना जीप चालकांना अडचण होते. कुळे पंचायतीतर्फे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खास जॅकेटची सोय करण्यात आली आहे. तसेच दूधसागर परिसरातील कचरा स्थानिक पंचायतीतर्फे गोळा केला जात आहे. पर्यटकांमुळे स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार मिळत असून दूधसागरवर आवश्यक सुविधा पुरविल्यास देश-विदेशातून याठिकाणी येणार्‍या पर्यटकांच्या  संख्येत वाढ होण्यास मदत होईल. तसेच कुळे पंचायत परिसरातील लोकांचा विकास करण्याच्यादृष्टीने पावले उचलली असल्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. 

खाणबंदी विषयी खासदार नरेंद्र  सावईकर यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खाणसंबंधी खाण अवलंबितांचे प्रश्न ऐकून घेतले. यावेळी त्यांनी राज्य सरकारला यासंबंधी अहवाल तयार करण्यासाठी सांगितले आहे. सदर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत तयार झाल्यानंतर केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने खाणबंदीचा निर्णय दिल्यामुळे न्यायालयाच्या मार्फतच आवश्यक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले. राज्य सरकार खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी कायदेशीर सोपस्कर पूर्ण करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारावरच तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र गोव्यातील खाणग्रस्तांनी काही काळ संयम बाळगण्याची गरज असल्याचे खासदार नरेंद्र सावईकर यावेळी म्हणाले. 

 

Tags : goa, goa news, Dudhsagar waterfall, SawaiKharkar


  •