Tue, Apr 23, 2019 21:42होमपेज › Goa › बचत गटांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा : श्रीपाद नाईक

बचत गटांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा : श्रीपाद नाईक

Published On: Jun 03 2018 1:13AM | Last Updated: Jun 03 2018 12:14AMपणजी : प्रतिनिधी

बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्र येऊन आर्थिक सक्षमता साध्य करता येते. महिला बचत गटांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी केले. आधारस्तंभ या बचत गटाने डोंगरी येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. श्रीपाद नाईक पुढे म्हणाले की, महिला सक्षम बनल्यास कुटुंब सक्षम होते, पर्यायाने देश सक्षम होतो. बचत गटांच्या कामासाठी खासदार निधीच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही ते म्हणाले. पंचायतीच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

बचत गटात तुम्ही एकटे नसता आणि सामूहिकदृष्ट्या तुम्ही कोणताही उपक्रम करता. जर तुम्हाला उद्योग सुरू करायचा असेल तर भांडवल लागते आणि भांडवलअभावी उद्योग सुरू होत नाही. पण बचत गट हा उपक्रमच मुळात आपल्या बचत रकमेवर आहे. बचत गट निर्माण होतो बचत किंवा संचित झालेल्या रकमेवर. बचत गट बनतो कमीत कमी दहा लोकांनी, मग ते दहा पुरुष असोत वा महिला. दहा लोक एकत्र येतात आणि एक बचत गट निर्माण करतात. बचत गटातील प्रत्येक दरमहा काही ठरावीक रक्कम बचत करतो आणि बचत गटात भविष्यातील उपक्रम किंवा व्यवसायांसाठी संचित करतो. दरमहा संचित केलेली रक्कम कितीही असू शकते, असेही ते म्हणाले.

बचत गट निर्माण करताना किंवा निर्माण झाल्यावर, बचत गटातील प्रत्येक सदस्याची बचत गटाविषयी समान वैयक्तिक जबाबदारी असते. प्रत्येक सदस्याने त्याच्या उपलब्धी आणि कुवतीप्रमाणे समानरीत्या जबाबदारी वाटून घ्यावी. प्रत्येक सदस्यामध्ये काही तरी गुण किंवा हुशारी असतात, त्यांच्या मदतीने बचत गटातील समस्या सोडवता आल्या तर सर्व प्रश्‍न किंवा समस्यांचे निर्मूलन होते, अशी भावना बचत गटातील प्रत्येक सदस्याची असावी.

दुसर्‍याविषयी काळजी हा परस्परांविषयीच्या अतूट नात्याचा आणि संबंधाचा संकेत आहे. दुसर्‍याविषयी काळजी बचत गटात विश्‍वास निर्माण करते आणि गटाला अभेद्य बनवते, असेही ते म्हणाले. परस्परांविषयी असलेला आदर बचत गटात समतोल आणि सामंजस्य निर्माण करते. गटातील सदस्य एकमेकांच्या भावनांचा, विचारांचा आणि प्रयत्नांचा आदर करू लागतात. त्यामुळे विविध कल्पनांना आणि विचारांना वाव मिळतो तसेच विचारांची आणि कल्पनांची देवाणघेवाण होते, असेही ते म्हणाले.