होमपेज › Goa › सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करणार्‍या माहितीचे जतन करा

सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करणार्‍या माहितीचे जतन करा

Published On: Feb 03 2018 2:25AM | Last Updated: Feb 03 2018 12:36AMपणजी : प्रतिनिधी

शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याची क्षमता जाणून ती आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत.आजच्या आधुनिक जगात अनेक स्रोतांतून माहिती सतत येत असल्याने माहितीचे आदान-प्रदान सोपे झाले आहे. मात्र, शिक्षकांनी भविष्यात   लोकांचे जीवन अधिकाधिक सुसह्य   करू शकणार्‍या माहितीचे जतन करावे, असे मत नोबेल पुरस्कार विजेत्या प्रा. क्रिस्तियाना नुसेन-व्होलार्ड यांनी व्यक्त केले.

कला अकादमीमध्ये झालेल्या ‘नोबेल डायलॉग’ या चर्चासत्रात क्रिस्तियाना बोलत होत्या. गुस्ताव कलस्ट्रँड यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली.  नोबेल पुरस्कार विजेते सर्जी हारोचे म्हणाले की, शिक्षण ही दीर्घकालीन प्रक्रिया असून त्याचे फलित खूप वर्षांनी मिळते. मात्र, नवीन शोधाचा  विनियोग लोकांच्या गरजेची वस्तू बनवण्यासाठी केला जात असून त्यातून आर्थिक नफा-तोट्याचे गणित मांडले जाते. 

नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड रॉबर्टस म्हणाले की, एकमेकांशी संपर्क साधणे अथवा संभाषण करणे ही एक महत्वाची कला आहे. शास्त्रज्ञांनी जनतेशी संवाद साधणे आजच्या काळात गरजेचे आहे. जर ही कला शास्त्रज्ञांना साध्य झाली तर त्यांनी लावलेल्या शोधांचा लाभ अधिकाधिक लोकांना  होऊ शकतो. 

शिक्षक चांगले जग निर्माण करू शकतो का, या प्रश्‍नावर रॉबर्टस म्हणाले की, आपल्या हाताखालील विद्यार्थी विद्यार्जन करताना त्याच्या पालकांच्याही ज्ञानात आपण नवी भर घालतो, हे शिक्षकांनी जाणले पाहिजे. 

दुसर्‍या चर्चासत्रात निमंत्रक संजीव आलिवाडी यांनी चर्चासत्र खुलवताना गंमतीदार प्रश्‍न मांडले. या चर्चासत्रात शिकवण्याचा दीर्घ अनुभव असलेले सदानंद मिशाळ, सिद्धार्थी सिनाय नेत्रावळकर, सिद्धराज मोपकर, पोंटूस थनब्लाड आणि अनिका हेदस फाल्ड यांनी आदर्श शिक्षक आणि शिक्षण पद्धतीबद्दलची मते मांडली.