होमपेज › Goa › सावर्डेत ग्रामस्थांनी रोखले ३२ खनिजवाहू ट्रक 

सावर्डेत ग्रामस्थांनी रोखले ३२ खनिजवाहू ट्रक 

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 23 2018 1:15AMकाकोडा : वार्ताहर

सेझा गोवा कोडली खाणीवरून कालमर्यादेचे उल्लंघन करून खनिज वाहतूक करणारे 32 ट्रक सावर्डे तिस्क येथे ग्रामस्थांनी रोखले. संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच वाहतुकीची परवानगी कंपनीकडून असताना रात्री 8 वाजता  वाहतूक होत असल्याचे लक्षात येताच  पंचायत सदस्य नीतेश भंडारी यांनी ग्रामस्थांना सोबत  घेऊन  ट्रक रोखले.

सावर्डे भागातील ट्रकांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच खनिज वाहतुकीची परवानगी कंपनीकडून दिली जाते. थोडा कालावधी वाढवून देण्याची मागणी सावर्डेतील स्थानिक ट्रक मालकांकडून झाल्यास ती इंटरनेट बंद आहे, किंवा संगणक खराब झाल्याचे सांगून फेटाळली जाते. मात्र, सोमवारी  रात्री 8 वाजल्यानंतर कंपनीतून 32 ट्रक एकामागोमाग एक याप्रमाणे बाहेर पडू लागताच आपल्याला संशय आला, असे नीतेश भंडारी  यांनी सांगितले. 

भंडारी म्हणाले, कंपनी स्थानिक ट्रक मालकांवर अन्याय करत असून सावर्डे बाहेरील ट्रक संध्याकाळी 6.45 वाजता खनिज भरून सोडल्याचे स्लीपवरून आढळून आले आहे. बाहेरील ट्रकांना वेळेचे बंधन असतानाही ते झुगारून चोरट्या मार्गाने संधी दिली जाते. कंपनीने हा प्रकार थांबवावा, असेही भंडारी म्हणाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कुडचडे पोलिस उपनिरीक्षक व्हॅरोनिका कुतिन्हो फौजफाट्यासह सावर्डे तिस्क येथे दाखल झाल्या व स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेऊन कायद्याचे उल्‍लंघन केलेल्या 32 ट्रकच्या चालकांचे परवाने व कंपनी गेट पास जप्‍त केले. व त्यांच्याविरोधात तक्रार नोंदविली. स्थानिकांनी सदर खनिज वाहतूक करणारे सर्वच्या सर्व ट्रक  पुन्हा कोडली सेझा गोवा कंपनीच्या आवारात पाठविण्याची मागणी केल्याने पोलिसांनी भरलेले ट्रक परत पाठवले.