Fri, Apr 26, 2019 09:25होमपेज › Goa › आराखडा-2021 खुला करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता : सरदेसाई

आराखडा-2021 खुला करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता : सरदेसाई

Published On: Apr 03 2018 1:40AM | Last Updated: Apr 04 2018 12:33PMपणजी : प्रतिनिधी

प्रादेशिक आराखडा-2021 खुला करण्यास मुख्यमंत्री पर्रीकर यांची मान्यता घेण्यात आली आहे.  आराखड्याशी संंबंधित जमिनीशी विविध विषय हाताळण्यासाठी नगरनियोजन खात्याकडून 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी दिली. पर्वरी येथे पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या  बोलताना सरदेसाई म्हणाले की, मागील सुमारे सहा वर्षे प्रलंबित ठेवण्यात आलेला प्रादेशिक आराखडा-2021 पुनरुज्जीवित करण्याचे सरकारने ठरविले आहे. या आराखड्यातील  तरतुदीनुसार राज्यातील ‘सेटलमेंट’, व्यावसायिक, संस्थात्मक आणि औद्योगिक   क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या विभागात विकासकाम करण्याला पडताळणी करून तसेच आवश्यकतेनुसार परवानगी दिली जाणार आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे प्रधान सचिव कृष्णमूर्ती यांच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आलेला असून त्यांनी या निर्णयाबाबत आपला पाठिंबा दिला आहे. राज्यातील जमिनीशी संबंधित निर्णय घेण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना देण्यात आली आहे.   


नगरनियोजन खात्याच्या 5 सदस्यीय समितीमध्ये अनुभवी  अभियंते, आर्किटेक्ट्स तसेच नगरनियोजन शास्त्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, राज्यातील ‘सेटलमेंट’, व्यावसायिक, संस्थात्मक आणि औद्योगिक क्षेत्रातील जमिनींवर विकासकामाबाबत निर्णय घेणे विविध अधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. एखाद्या 250 चौरस मीटर जमीन असलेल्या घरमालकाच्या बांधकामाच्या परवान्याबद्दल निर्णय तालुका पातळीवरील नगर नियोजक अधिकारी घेणार आहे. तर 250 ते 500 चौरस मीटर्स जमिनीवरील बांधकामाबाबत  जिल्हा पातळीवरील नगर नियोजक अधिकारी, 800 ते 4 हजार चौरस मीटर जमिनीवरील विकासकामाबाबत मुख्य नगर नियोजक अधिकार्‍याची मान्यता घ्यावी लागणार आहे. राज्यातील 4 हजार चौरस मीटर जमिनीवरील व्यावसायिक, औद्योगिक आणि संस्थात्मक विकासकामाबाबतच्या निर्णयाचा अधिकार मात्र सरकारने आपल्याकडे ठेवला असल्याची माहिती सरदेसाई  यांनी दिली. 

Tags : Goa, Goa News,  Sardesai, Chief Minister, approval,  open plan 2021