Sun, Dec 15, 2019 04:41होमपेज › Goa › ‘साळगावा’त पणजीचा कचरा १५ दिवसच स्वीकारणार : लोबो

‘साळगावा’त पणजीचा कचरा १५ दिवसच स्वीकारणार : लोबो

Published On: Jun 26 2019 1:38AM | Last Updated: Jun 27 2019 1:33AM
पणजी : प्रतिनिधी

पणजी शहरातील ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी हिरा पेट्रोलपंप जवळील जागेत येत्या 15 ते 20 दिवसांत ‘मिनी कचरा प्रकल्प’ उभारला जाणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत पणजीतील ओला कचरा साळगाव कचरा प्रकल्पात स्वीकारला जाणार असल्याची माहिती गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा उपसभापती मायकल लोबो यांनी दिली.  या आश्‍वासनामुळे पणजी शहरावर आलेले कचरा संकट तूर्तास शमले आहे. 

पणजीतील कचरा साळगाव प्रकल्पात आणण्यास मनाई केल्याने पणजी आणि कळंगूट मतदारसंघात वाद पेटला होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी पणजी महानगरपालिकेच्या सभागृहात लोबो, पणजीचे आमदार अतानसिओ मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर तसेच अन्य नगरसेवकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना लोबो यांनी सांगितले की, पणजीतील कचर्‍याची समस्या सोडवण्यासाठी शहरातील हिरा पेट्रोल पंपच्या मागील बाजूला असलेल्या जागेचा वापर करण्याचे ठरविण्यात आले. या जागेत सध्या पणजी मनपाची शेड तयार असून या जागेत ‘हिंदुस्तान कंपनी’कडून यंत्रणा उभारली जाणार आहे. सदर कंपनी सध्या साळगाव येथील कचरा प्रकल्पाचे व्यवस्थापन करत असून साळगाव प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी त्यांच्याकडे अतिरिक्त यंत्रणा तयार आहे. सदर यंत्रणा पणजीत आणून ती येत्या 15-20 दिवसांत हिरा पेट्रोलपंप मागील जागेत बसवण्यात येणार आहे. या प्रकल्पात फक्त  पणजी आणि ताळगावातील ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया केली जाणार आहे. सदर प्रकल्प पणजीत सुरू होईपर्यंतच्या पणजीतील कालावधीत ओला कचरा साळगाव प्रकल्पात प्रक्रियेसाठी आणण्यास मान्यता दिली जाणार आहे. सध्याच्या समस्येवर हाच सर्वात चांगला तोडगा दृष्टीक्षेपात आहे, असे ते म्हणाले.

या तोडग्याला मान्यता देताना पणजीचे आमदार अतानसिओ मोन्सेरात म्हणाले की, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी बायंगिणी येथे कचरा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचा विश्‍वास व्यक्‍त केला होता. मात्र , त्यानंतर या घोषणेबाबत काहीही पावले पडली नाहीत. बायंगिणी येथील नियोजित प्रकल्पाबाबत आपण कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांच्याकडे चर्चा केली असून त्यांचा बायंगिणी येथे कचरा प्रकल्प स्थापण्यास कोणताही विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. साळगाव येथे भव्य तथा आधुनिक कचरा प्रकल्प बांधण्यात आला त्यावेळीच पूर्ण उत्तर गोवा जिल्ह्यातील कचर्‍याच्या विल्हेवाटीबाबत विचार व्हायला हवा होता. 

दरम्यान, कळंगूटचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाचे अध्यक्षपद देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे अनेक महत्वाची कामे आणि जबाबदारी असल्याने त्यांनी महामंडळाचा ताबा लोबो यांच्याकडे सुपूर्द करण्याची गरज आहे. लोबो यांच्याकडे राज्यातील कचरा समस्या सोडवण्याची इच्छा आणि वेळही आहे, असे मत पणजीचे आमदार अतानसिओ मोन्सेरात यांनी व्यक्‍त केले.